गाण्याने श्रम होतात हलके!

सामना प्रतिनिधी । मुंबई

संगीत… प्राचीन हिंदुस्थानी संस्कृतीत सामवेदातून उपजलं. आजच्या संगीत दिनानिमित्त…

संगीत आणि अध्यात्म. दोन्ही गोष्टी एकमेकांत सहज मिसळून गेलेल्या… दोन्ही श्रवणीय, समजणाऱ्यांसाठी सुगम. आनंददायी… आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मनास शांतवणाऱ्या… संगीताचे अनेक प्रकार. मूळ संगीत लोकमातीशी इमान राखणारे. किंबहुना त्या मातीतूनच आलेले. मनोरंजनासाठी आणि त्यातून प्रबोधन हा लोकसंगीताचा खरा उद्देश्य. लोकसंगीतावर पुढे असंख्य संस्कार होत गेले. त्यातून संगीतातील शास्त्रीयता निर्माण झाली. तसे पाहिले तर शास्त्रीय संगीताचे मूळ आपल्या चार वेदांपैकी सामवेदात आहे. आई सरस्वतीचे वीणावादन, गणेशाचे नृत्य, गायन, वादन, शिवशंकराचे तांडव. साऱ्याच्या मूळाशी ताल, लय, संगीत. देवादिकांनीही व्यक्त होण्यासाठी संगीत जवळ केले. रावणाने रचलेले शिवस्तोत्र जेव्हा त्याला संगीताशी जोड मिळते तेव्हा डमरूच्या तालावर अधिक प्रभावी होते.

पुराणकाळात जरी संगीतात शास्त्रीयता सापडत असली तरी हे संगीत स्वर्गातून खाली उतरले तेव्हा खऱ्या अर्थाने लाल काळ्या मातीशी एकाकार झाले… आणि हे लोकसंगीत इतके प्रभावी ठरले की त्याच्या टाळ-चिपळ्यांच्या तालावर प्रत्यक्ष विठोबा डोलू लागला. तुकोबा, ज्ञानोबांचे अभंग सहज सोप्या चालीवर भक्तांच्या ओठी रूळू लागले. राम कृष्ण हरी हा बीजमंत्र रूजला. वाढला. एकनाथांची भारूडं खऱ्या अर्थाने जनमानसात बहुरूढ झाली. ती संगीताच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू विकता विकता बुरगुंडा ज्ञान वाटू लागला. लयीत… तालात… हरीपाठाचे अभंग संगीताचा हात धरून प्रत्येकास शांतवू लागले. ज्ञानेश्वरीचा मोगला खऱ्या अर्थाने फुलला तो लताबाईंच्या कंठातूनच. हीच गोष्ट स्तोत्र आणि श्लोकांची. संस्कृत श्लोक, अथर्वशीर्ष, रामरक्षा ही आपली खऱ्या अर्थाने ज्ञानसंपदा. सामान्यांना म्हणण्यास तशी अवघड. पण हीच स्तोत्रे जेव्हा लयीत, तालात उमटू लागतात तेव्हा अत्यंत श्रवणीय होऊन सुरेल भासू लागतात… श्रीगणेशाने अथर्वशीर्षाची निर्मिती तालात तर केलीच. पण या लयीने निर्माण होणारा आवर्त भक्तांच्या मनावर आणि शरीरावर सकारात्मक दूरगामी परिणाम करणारा ठरला. आज हेच संगीत केवळ मनोरंजन म्हणून न राहता आरोग्यदायी ठरले आहे.

कोणत्या रोगावर कोणता राग

म्युझिक थेरपी ही संकल्पना फार जुनी आहे. पंचकर्म, स्वेदन व मसाज सुरू असताना ठरावीक व्याधींवर ठरावीक रागदारीतील संगीत लावून उपचार केल्यास त्याचा फायदा झालेला दिसतो.

– रागातील कोमल स्वर मेंदूला शिथिल करतो आणि झोप देतो, तर शुद्ध स्वर ऊर्जा किंवा जागरुकता देतो. संगीताच्या ग्रंथांमध्ये कोणते ध्वनी कफ, पित्त, वात अशा विकारांकर उपयुक्त ठरू शकतात, याचे उल्लेख आहेत.

– वाताकर उच्च स्तरावरील ध्वनी ऐकणं फायदेशीर असतं. त्यानुसारच राग बांधण्यात आले असतात, ते ऐकण्याच्या वेळाही ठरविण्यात आल्या आहेत.

– उच्च रक्तदाबासाठी राग ‘पुरिया’ आणि ‘हिंडोल’ हे राग उपयुक्त आहेत.

– निद्रानाश ‘बागेश्री’ राग आणि ‘भैरवी’ मानसिक तणावाला ‘अहीर भैरव’ आणि ‘पुरिया’ उपयुक्त ठरतो.

– संताप कमी करण्यासाठी ‘मधुवंती’ राग, ‘मधुवंस’ राग ‘मारूबिहाग’ हे उपयुक्त ठरतात.

– हृदयविकाराकर ‘भैरवी’, ‘शिवरंजनी’ हे उपयुक्त.

– आम्लपित्त, दाह, उष्णता आणि ऑसिडीटी यावर राग काफी, खमाज, मारवा, कलावती ऐकल्यास फरक पडतो.

– सारंगी, सरोद आणि सतार ही तार वाद्ये उपयुक्त ठरतात. तारांत कंप असतो, तो हृदयापर्यंत पोहचतो. तंतुवाद्य हे

उपयुक्तच ठरतात.

– राग विशिष्ट पद्धतीने वाजविला किंवा गायला तरच त्याचा परिणाम होतो एरवी त्याने नुसते मनोरंजन होते.

– डोकेदुखी, पोटदुखी, संधीवात, ऑसिडीटी, मधुमेह, कोलायटिस, यकृताचे विकार, अस्थमा, रक्तदाब, निद्रानाश, फिट्स अशा अनेक विकारांकर संगीतोपचार उपयुक्त ठरत आहेत. अर्थात औषधांसोबतच पूरक उपाय म्हणून या उपचारांचा खूप फायदा होतो.