ठसा : श्रीधर माडगूळकर

>>प्रशांत गौतम<<

गदिमांचे सुपुत्र अशी ओळख असलेले श्रीधर माडगूळकर लेखक म्हणून कार्यरत होते. एवढेच नव्हे तर साहित्य क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान होते. त्याचसोबत आपले वडील गदिमा यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसाही त्यांनी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जोपासला, पुढे नेला. मग ते पुण्यातील गदिमा प्रतिष्ठान असो की माडगूळ येथील गजानन विकास प्रतिष्ठान असो, याद्वारे त्यांनी गदिमांच्या स्मृती जपल्या. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून ते आजारीच होते. साहित्यलेखनाचे संस्कार घरातच वडील गदिमांकडून मिळाले. बालपणापासून लाभलेला हा समृद्ध वारसा श्रीधरजींनी पुढील काळात विविध साहित्यविषयक, सामाजिक उपक्रम यातून प्रयत्नपूर्वक जपला. 1970 च्या सुमारास ते ‘जिप्सी’ या तरुणांसाठीच्या मासिकाचे संपादन करीत असत. या माध्यमातून त्यांनी त्या काळातील अनेक प्रतिभावंत तरुण लेखकांना साहित्यलेखनासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. नवीन लेखकांना पुढे येण्यासाठी संधी प्राप्त करून दिली. या ‘जिप्सी’प्रमाणेच धरती आणि साप्ताहिक ‘मातृभूमी’ या नियतकालिकांचे उपसंपादक म्हणून त्यांनी काम केले. या प्रवासात त्यांच्यातील साक्षेपी संपादकही घडत होता. विविध नियतकालिकांचे संपादन करीत असतानाच श्रीधररावांनी आपल्यातील लेखक कायम जागता ठेवला. त्यांनी कथा, कादंबरी, वाङ्मय प्रकारात स्वतःची वाट निर्माण केली. त्यांची ‘आठी आठी चौसष्ट’ ही कादंबरी विशेष उल्लेखनीय समजली जाते. एवढेच नव्हे तर, राजकीय कादंबरी लेखन क्षेत्रात या कादंबरीचे महत्त्व अधोरेखित केले जाते. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी  म्हणजे गदिमा! गीतरामायणचे सबकुछ म्हणजे गदिमा. अनेक मराठी चित्रपटांच्या कथा आणि पटकथेचे लेखक गदिमा, गीतकार, कवी गदिमा अशा कितीतरी आठवणी गदिमांच्या सांगितल्या जातात. श्रीधरराव वडिलांच्या साहित्यलेखनाचेही साक्षीदार, हाच वारसा श्रीधररावांनी ‘आठवणी गदिमांच्या’ या पुस्तकातून वाचकांसमोर आणला आहे. याचसोबत त्यांनी ‘थोरली पाती, धाकटी पाती’ यासारख्या साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन दूरदर्शन तसेच आकाशवाणीच्या माध्यमातून करून मोठे कार्य केले. श्रीधररावांचे भाग्य एवढे थोर होते की, त्यांना साहित्य, वाचन, संस्कृतीचा वारसा वडील गदिमा आणि काका व्यंकटेश माडगूळकर यांच्याकडून लाभला, ज्याचा लाभ त्यांना आयुष्यभरासाठी होत गेला.

गदिमांचा साहित्यविषयक वारसा तर त्यांनी विविध माध्यमांतून जपला आणि सामाजिक कार्यातूनही. सांगली जिह्यातील माडगुळे या गावी त्यांनी गजानन विकास संस्थेची स्थापना केली. गदिमांच्या नावाने एक शाळाही सुरू केली. सुमारे आठ एकर जागेवर हे हायस्कूल असून पाचशे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. 1997 च्या सुमारास इंटरनेटवर ‘जाळं’ या पहिल्या साप्ताहिकाची दमदार सुरुवात केली. त्याचे यशस्वी संपादन केले. ‘गदिमा  डॉट कॉम’ ही साहित्य क्षेत्रातील मोठी वेबसाइट सुरू केली. या कामाचाही त्यांना पुढील काळात फायदा झाला. ‘मराठी सृष्टी कॉम’ या साहित्यिक वेबसाइटच्या सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून श्रीधर माडगूळकर यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांना समृद्ध बालपण लाभले. माडगूळ या गावाशी, गावातील लोकांचा त्यांचा भावस्पर्शी अनुबंध होता. गावाचे समृद्धपण त्यांनी ‘मालगुडी डेज’मध्ये अतिशय प्रभावीपणे शब्दबद्ध केले आहे. गावाचे आणि गावातील घरांचे रसाळ वर्णन ते करतात. संपर्कात आलेल्या व्यक्तीचे ते शब्दचित्र रेखाटतात.  विशेषतः माडगूळमधील त्यांचा वाडा हा प्रत्यक्ष वाचल्यावरच खरी मजा येते. याच वाडय़ातील अंगणामध्ये त्यांनी राजकारणाचेही धडे गिरवले. पुढील काळात 1978 साली शहर काँग्रेसच्या सरचिटणीसपदी, तर नंतर पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. ते काँग्रेस पक्षाचे काम करीत असले तरी त्याचा पहिला गृहपाठ माडगूळच्या पंचक्रोशीत झाला आणि क्रिकेट खेळाविषयीची आवडही याच कुशीत निर्माण झाली.

साहित्य, सामाजिक, राजकारण या क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडली. कामगार क्षेत्रात अपवाद नव्हता. मॅफ्कोच्या कामावरून अन्यायाने 54 कामगारांना काढण्यात आले होते. माडगूळकर यांच्या पुढाकारामुळे या कामगारांची नोकरी वाचली. पुणे पीएमटी कामगारांना संघटित करून तेथील मनपाच्या को-ऑपरेटिव्ह बँकेतील भ्रष्टाचार उघडकीस आणला, एवढेच नव्हे तर, त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे भ्रष्ट संचालकही बरखास्त करण्यात आले. सद्गुरू जंगली महाराज ऑटोरिक्षा संघटनेच्या स्थापनेत त्यांचा केवळ सहभागच नव्हता, तर त्यांनी पुढाकार घेऊन रिक्षाचालकांचे प्रश्न यथाशक्ती सोडवले.  कामगार कल्याण मंडळाचे सभासद असल्याच्या कार्यकाळात माडगूळ ग्रामीण भागातील गावात पहिले कामगार कल्याण केंद्र सुरू केले. कामगारांसोबत काम करतानाच त्यांनी कामगार साहित्य परिषदेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. 1981-82च्या सुमारास एमएसईबी सबऑर्डिनेट इंजिनीअर्सचा मोठा संप झाला होता. त्यात माडगूळकरांनी यशस्वी मध्यस्थी करून समेट घडवून आणला होता.

श्रीधर माडगूळकर यांच्या निधनाने  साहित्य, कला, क्रीडा, राजकारण या सर्वच क्षेत्रांत त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडली होती. तरुणांसाठी व कामगारांसाठी  हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देणारा लेखक हरपला आहे.