यशवंतराव क्षीरसागर

  • अरविंद क्षीरसागर

सानेगुरुजींवरील अविचल निष्ठेने गेली ४५ वर्षे प्रकाशित होणाऱ्या ‘बालविकास मंदिर’ मासिकाचे संस्थापक-संपादक आणि सानेगुरुजी बालविकास मंदिर संस्थेचे अध्यक्ष यशवंतराव क्षीरसागर यांचा आणि सानेगुरुजींचा संपर्क १९४६ मध्ये झाला. या भेटीनेच यशवंतरावांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. साने गुरुजी यशवंतरावांच्या लतिफ बिल्डिंग, दादर येथील घरी वारंवार येत असत. त्यांनी यशवंतरावांच्या वाढदिवसप्रसंगी एस. एम. जोशी यांचे ‘ऊर्मी’ भेट देऊन त्यावर कविता लिहिली होती.

‘‘नव तुज यशवंता लागले आज वर्ष
म्हणून मम मनाला होतसे फार हर्ष
सतत करून यत्ना मेढवी सद्यशाते
प्रभु तुज सुखी प्रार्थना तत्पदाते’’

गोरगरीबांकडे, मुलांकडे देशाचे महत्त्वाचे घटक म्हणून पाहण्याची, विषमता दूर करून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याची आणि सानेगुरुजींची जीवनदृष्टी आत्मसात करून त्यानुसार लोकांचे जीवन घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न यशवंत क्षीरसागर गेली ६५ वर्षे अविरतपणे करीत आहेत. गांधीजी, सानेगुरुजी, विनोबाजी ही त्यांची आराध्य दैवते आहेत. स्वामी अखंडानंद सरस्वती यांच्या सत्संगामुळे व अनुग्रहामुळे यशवंतरावांच्या जीवनाला आध्यात्मिक बैठक मिळाली आहे. सानेगुरुजी कथामालेचे ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागांत शाळा आणि महाविद्यालयांमध्य जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना संस्कारक्षम कथा सांगण्याचे कार्य ते अविरतपणे करीत आहेत. मराठीसह हिंदी व इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. सानेगुरुजी बालविकास मंदिर आणि बालविकास मंदिर यांच्या माध्यमातून बाल वाचनालये, विविध विद्यार्थी स्पर्धा, संस्कार शिबीर ते आयोजित करीत असतात. त्यांनी मराठी वृत्तपत्रे, मासिके या व्यतिरिक्त मुंबई विद्यापीठाच्या ‘‘भारती’’ या हिंदी मासिकातून सानेगुरुजींच्या जीवनावर १०० लेख प्रसिद्ध केले आहेत. स्वामी अखंडानंद सरस्वतीजींच्या बोधकथा हे पुस्तकही त्यांनी लिहिली आहेत. सानेगुरुजी कथामालेचा सानेगुरुजी बालसेवा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. हरी ओम, टस्टतर्फे ‘हरी ओम पुरस्कार, कै. संस्कृती वेंगुर्लेकर स्मृती समाजसेवा पुरस्कार असेही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या ‘स्वर्गीय बळवंतराव क्षीरसागर अध्यात्म केंद्राच्या विविध आध्यात्मिक, सामाजिक, गीता/ गीताई प्रचार कार्यास त्याचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन असते.