ठसा : साधनेला डोळस दिशा देणारे दादाजी

309

>>विजया पांचाळ

‘‘शैले शैले न माणिक्यम्

मौक्तीम न गजे गजे

साधवो न ही सर्वत्र

चंदनम् न वने वने’’

आपल्या संस्कृत साहित्यात जे ज्ञान चार शब्दांत सांगितले आहे ते चार हजार शब्दांतही सांगता येणार नाही. अशा वंदनीय ऋषीमुनींच्या माहात्म्याची आठवण ज्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून यावी असे आमचे गुरुवर्य म्हणजे योगतज्ञ दादाजी वैशंपायन. अविश्वसनीय अशी त्यांची साधना! उपासना! वयाच्या सोळाव्या वर्षापासून त्यांनी साधनेला सुरुवात केली. हिमालयातील रक्त गोठविणाऱ्या थंडीमध्ये त्यांनी तीन वर्षे राहून विविध साधना केल्या, परंतु बंधनामुळे त्या सांगू शकत नाही, पण एक मात्र नक्कीच की, त्यांनी त्यांच्या सर्व सर्व शक्तींचा उपयोग केवळ आणि केवळ गरजू लोकांच्या संकट निर्मूलनासाठीच केला. सामाजिक बांधिलकीचा वसा जपणे हेच त्यांचे आध्यात्मिक कार्य राहिले आहे. गरजू, अपंग-अंध, मूक-बधीर व्यक्ती आणि त्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना सामाजिक पुरस्कार आणि अर्थसहाय्य देण्याचे दादाजींचे कार्य अजूनही सुरू आहे.

असा गैरसमज असतो की, आध्यात्मिक वाटचाल आणि साधना करणारे अंधश्रद्ध असतात, परंतु दादाजींनी साधकांच्या साधनेला आणि विचारांना एक डोळस दिशा दिली. प्रत्येक पुराणातील कथेमागे आध्यात्मिक आणि शास्त्र्ााrय दृष्टिकोन कसा आहे हे साधकांना समजावून दिले. श्री दत्तगुरूंनी 24 गुरू केले म्हणून आपणही दहा ठिकाणी जावे असे नाही. कधीही दहा दगडांवर उभे राहणाऱ्याला स्थैर्य लाभत नाही. दत्तगुरूंनी 24 गुरू केले म्हणजे त्यांनी जे जे आणि ज्यांच्यात ज्यांच्यात सुयोग्य दिसले ते ग्रहण केले. अंगीकारले. उदाहरणार्थ पृथ्वीकडून स्थिरता घेतली. वायूपासून सर्वत्र संचार करीत असतानाही सुगंध-दुर्गंधापासून अलिप्त राहावे हे स्वीकारले. नभापासून अमर्यादता ज्ञानाच्या बाबत अंगीकारली. अग्नीपासून तेजस्विता, पाण्यापासून शुद्धता, वाढणाऱ्या कमी होणाऱ्या चंद्रापासून वार्धक्य व तारुण्य ही अवस्था शरीराची आहे, आत्म्याची नाही हे जाणले. सूर्याची विविध ठिकाणी विविध दिसणारी प्रतिबिंबे म्हणजे आत्मतत्त्व एकच, पण संगतीने वेगळे दिसते हे जाणले. समुद्रापासून अंतरात कितीही खळबळ असली तरी आपण बाहेर शांत राहावे हे स्वीकारले. असे हे सर्व विचार करण्यास दादाजींनी साधकांना प्रवृत्त केले. कलियुगात फलदायी ठरणाऱ्या उपासनेचा मार्ग दाखविला. आत्म्याचा उद्धार कसा करावा हे मार्गदर्शन केले. तणावग्रस्त असतानाही शांती अंगीकारावी! कितीही धन असले तरी समाधान नसेल तर शांती नसते. सुयोग्य मार्गांनी मिळविलेली संपत्तीच समाधान देते. सकारात्मक विचारसरणीमुळे कोणत्याही घडणाऱ्या घटनेचे विश्लेषण करता येते. सृजनात्मक आणि सर्जनात्मक विचार करण्याची क्षमता अंगी येते. मनात सतत चांगले विचार ठेवले की, प्रत्येक घटनेत काहीतरी चांगले दिसतेच आणि चांगले घडतेही. एक निरोगी समाज निर्माण होतो! अशी ही विचारसरणी दादाजींनी त्यांच्या वागण्यातूनच साधकांना दिली.

दादाजींनी सर्व साधकांना असे डोळसपणे विचार करण्यास उद्युक्त केले. नुसतेच जपतप करून पुण्यप्राप्ती होत नाही. आपण ज्या समाजात राहतो त्याचेही आपण देणे लागतो. अशा सर्वांना भरघोस दान देणे आणि ते योग्य त्यांनाच देणे हे त्यांनी स्वतःच्या वागण्यातूनच साधकांना सांगितले.

सर्वे सुखिनः संतु; सर्वे संतु निरामया!

सर्वे भद्राणि पश्यंतू;

मा कश्चित दुःख भाग भवेत!’

हेच त्यांचे जिवित कार्य! आणि ते आचरणातही आणतात. दादाजींचा जन्म 7 मे 1920 रोजी बुद्धपौर्णिमा या पवित्र दिनी झाला. आज ते 100 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. साधकांना ही एक पर्वणीच आहे. परमेश्वराने लोककार्यासाठी आणि साधकांच्या उद्धारासाठी त्यांना आणखी खूप आयुष्य द्यावे हीच प्रार्थना.

आपली प्रतिक्रिया द्या