मुद्दा : मुंबईच्या लाल परीला वाचवा…

प्रातिनिधिक फोटो

दादासाहेब येंधे  

मुंबईत अतिवृष्टी असो, बॉम्बस्फोट असो की, सण-वार वेळच्या वेळी मुंबईकरांच्या सुख-दुःखात बेस्ट धावून आलेली आहे. मुंबकरांसोबत बेस्टचे एक वेगळेच नाते जडले आहे. हा भावनिक मुद्दा असला तरी तिचे अस्तित्व अबाधित ठेवणे सर्वांचे कर्तव्य आहे.

बेस्टची आर्थिक परिस्थिती चांगली नाही हे सांगितले जात आहे. बेस्टचा विद्युत विभाग हा नफ्यात आहे. पण बससेवा तोट्यात आहे. विद्युत विभागामुळे बेस्ट उपक्रम तरला आहे. दहा वर्षांपूर्वी बस सेवेचे प्रवासी 42 लाखांवर होते. तीच प्रवासी संख्या आजघडीला 25 ते 26 लाखांवर आली आहे. दिवसेंदिवस प्रवासी संख्या कमी होत असताना, त्याचे नियोजन करताना बेस्ट प्रशासन अपयशी ठरत आहे.

खरे तर बेस्ट ही नफा कमावणारी संस्था मुळातच नाही ती एक सेवा देणारी संस्था आहे आणि जर का ती सेवा देणारी संस्था असेल तर ती फायद्यात असूच शकत नाही. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका हीसुद्धा सेवा प्रदान करणारी संस्था आहे. पण त्यातील शिक्षण व आरोग्य विभाग हे नफ्यात आहेत का? जर ते नसतील तर बेस्ट फायद्यातच असावी असे कसे म्हणता येईल. त्यामुळे कुठलीही सेवा देणारी संस्था फायद्यात असूच शकत नाही. त्याकरिता राखीव निधीची तरतूद करायला हवी. राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने त्यांना मदत करावयास हवी.

वर्षानुवर्षे भाडेवाढ न केल्यास तूट वाढत जाते व ती भरून काढण्यासाठी अचानक मोठी भाडेवाढ केल्यास जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. मात्र बेस्टसारख्या संस्थांच्या गळ्याला नख लागले तरी त्याचे राजकीय पक्षांना सोयरसुतक नसते. त्यातच अनेक भागांत रिक्षा व टॅक्सी यांच्या पॉइंट टु पॉइंट सर्व्हिसला आणि शेअर सेवेला परवानगी दिल्याने प्रवाशांचा कल त्याकडे वळला. शेजारील नवी मुंबई, ठाणे वगैरे महापालिकेतील बसना मुंबईत येण्यास परवानगी दिली गेल्याने बेस्टचे कंबरडे पारच मोडले. आता तर ओला, उबेर वगैरे टॅक्सी सेवांनी सर्वच महापालिकांच्या परिवहन सेवांपुढे आव्हान उभे केले आहे. वातानुकूलित बसगाड्या हा तर बेस्टसाठी पांढरा हत्ती ठरला. बेस्टच्या सर्वसाधारण भाड्याच्या तुलनेत वातानुकूलित बसचे भाडे तिप्पट असल्याने प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरवली. याखेरीज बसगाड्यांचे सुटे भाग, टायर खरेदीचे वाढलेले भाव हेही बेस्ट ‘पंक्चर’ होण्याचे एक कारण आहेच. गेल्या काही वर्षांत ब्रिटिशांचे सार्वजनिक वाहतुकीचे मॉडेल मोडीत काढून खासगी मोटारींचे अमेरिकन मॉडेल मुंबईकरांनी जवळ केले आहे. परिणामी मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत वेळीच बेस्टसारखी संस्था आर्थिक अरिष्टातून बाहेर काढणे गरजेचे आहे.

बेस्टसाठी मुंबईत स्वतंत्र मार्गिका असावी ही मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून आहे. पण बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिका तयार केली जात नाही, हे दुर्दैव. भायखळा, परळ, फोर्ट, दादर, कुर्ला, घाटकोपर, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वांद्रेसारख्या इतर बर्‍याच भागांत बेस्टच्या थांब्याच्या 100 मीटर अंतरापर्यंत रिक्षा, टॅक्सी उभ्या असतात त्यावर बंदी घातली जाणे गरजेचे आहे. जेणेकरून प्रवासी बेस्टकडे वळतील.