ध्यानी, मनी फक्त सावरकरच

2

>> उदय जोशी

स्वा. सावरकरांच्या विचारांनी झपाटलेला एखादा प्राध्यापक सावरकरांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी पदरमोड करीत पायाला भिंगरी लावून फिरतो, अगदी सावरकर विरोधकांनाही सावरकर समजावून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा सुखद धक्काच बसतो. प्रा. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर असे या ध्यानी, मनी फक्त सावरकरच असलेल्या माणसाचे नाव.

स्वातंत्र्यवीर सावरकर या नावाचाही स्पर्श होऊ नये अशी काळजी या देशातील अनेक उच्चशिक्षित, बुद्धिवंत घेत असतात. सावरकरांवर यथेच्छ चिखलफेक करणे हा त्यांचा आवडता छंद असतो. किंबहुना सावरकरद्वेष हा ‘सो कॉल्ड इंटलेक्चुअल एलाइट क्लास’ची आवश्यक गुणवत्ता असते. अशा वेळी स्वा. सावरकरांच्या विचारांनी झपाटलेला एखादा प्राध्यापक सावरकरांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी पदरमोड करीत पायाला भिंगरी लावून फिरतो, अगदी सावरकर विरोधकांनाही सावरकर समजावून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा सुखद धक्काच बसतो. प्रा. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर असे या सावरकर विचारांनी झपाटलेल्या माणसाचे नाव. गेल्या दोन तपांपासून त्यांचे सावरकर विचारांचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. ‘दिवसभर सावरकर’ हा त्यांचा एक अभिनव उपक्रमदेखील त्यांच्यातील भिनलेले सावरकर स्पष्ट करण्यासाठी पुरेसा आहे. या उपक्रमाद्वारे प्रा. बाहेगव्हाणकर आठवडय़ातून एक संपूर्ण दिवस फक्त सावरकर साहित्याचा प्रचार आणि प्रसारासाठी खर्च करतात. त्यातही ज्या कुटुंबांना सावरकरांची माहिती नाही त्यांना त्यांच्या घरी जाऊन बाहेगव्हाणकर भेटतात. सावरकरांचे जीवनकार्य, त्यांचे साहित्य, देशासाठी केलेला त्याग याची पूर्ण माहिती त्या कुटुंबाला देतात. वर सावरकरांची पुस्तकेही भेट देतात. हे काम सावरकरांच्या विचारांनी पूर्णपणे भारावलेला माणूसच करू शकतो. सावरकरांचा देशभक्तीचा विचार सर्वदूर पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे असे ते सांगतात. एखादा माणूस विशिष्ट विचाराने किती भारावलेला असतो याचा प्रत्यय बाहेगव्हाणकर सरांच्या घरात प्रवेश करताना येतो, अगदी प्रवेशद्वारासमोरच सावरकरांची भव्य प्रतिमा दिसते. हॉलमध्ये जिकडे तिकडे सावरकरच दिसतात. दर्शनी भागात सावरकरांचा छोटा पूर्णाकृती पुतळा आहे. त्यापुढे अंदमानमधून सावरकरांच्या कोठडीतून आणलेली पवित्र माती एका पात्रात ठेवली आहे.

प्रा. बाहेगव्हाणकर यांचा जन्म बीड येथे झाला. पदवी शिक्षण पूर्ण केल्यावर इंग्रजीत एम.ए. केले. नंतर संभाजीनगर येथे पत्रकारितेमध्ये पदवी घेतली आणि 1996 मध्ये बीड येथील सावरकर महाविद्यालयात इंग्रजी विभागात अध्यापन सुरू केले. दुसरीकडे स्वा. सावरकरांच्या समग्र साहित्याचा अभ्यासही सुरू ठेवला. ज्या ज्या ठिकाणी सावरकरांचे वास्तव्य होते त्या त्या ठिकाणांना भेटी देणे, सावरकरांवर व्याख्याने देणे आदी उपक्रमही त्यांनी सुरू ठेवले. सावरकर दर्शन प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे हे कार्य सुरू आहे. सावरकरांची जयंती आणि आत्मार्पण दिन याचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात कुणी बोलवेल त्या ठिकाणी स्वखर्चाने जाऊन विनामानधन व्याख्यान देण्याचा संकल्प प्रा. बाहेगव्हाणकर यांनी केला आहे. आतापर्यंत अशी एक हजारांपेक्षा जास्त व्याख्याने त्यांनी दिली आहेत. महाकवी सावरकर, विज्ञाननिष्ठ सावरकर, प्रज्ञावंत इतिहासकार सावरकर, सावरकरांची राष्ट्रभक्ती, सूर्यबिंबाचा शोध, समाज क्रांतिकारक सावरकर, क्रांतिकारकांचे मुकुटमणी सावरकर, सावरकरांचा मानवतावाद, सावरकर आणि भाषाशुद्धी, अर्थचिंतक सावरकर, अंदमान पर्व अशा विविध विषयांवर ते व्याख्याने देत असतात. 2008 मध्ये सावरकरांच्या त्रिखंडात गाजलेल्या ऐतिहासिक उडीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉ. बाहेगव्हाणकर यांनी ‘सावरकरांची गरुडझेप’ या विषयावर शंभर व्याख्याने देण्याचा संकल्प केला आणि संपूर्ण मराठवाडय़ात यानिमित्ताने शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर सावरकरांचे विचार मांडण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्याचा अभ्यास आणि त्यावर संशोधन झाले पाहिजे यासाठी डॉ. बाहेगव्हाणकर यांनी आपल्या घरी समग्र सावरकर साहित्य लोकांसाठी खुले ठेवले आहे. ज्यांना कोणाला सावरकरांच्या साहित्याचा अभ्यास करायचा आहे, त्यांच्या साहित्य प्रकारावर संशोधन करायचे आहे त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याची इच्छा सर बोलून दाखवतात. सावरकरांच्या प्रचार, प्रसाराशिवाय इतरही वेगवेगळय़ा उपक्रमांमध्ये बाहेगव्हाणकर यांचा तेवढाच सक्रिय सहभाग असतो. हिंदुस्थानची जनगणना 2011 मध्ये शासनातर्फे मास्टर ट्रेनर म्हणून कार्य त्यांनी केले आहे. बहिःशाल विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगरतर्फे कॉपीमुक्त परीक्षा अभियानात विविध महाविद्यालयांत व्याख्यान, तर अंदमान येथील विश्व साहित्य संमेलनात सावरकर साहित्य प्रचार आणि प्रसिद्धी विषयावर मांडणी त्यांनी केली होती. त्याचबरोबर इंग्रजी विषयाच्या अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये 250 शोधनिबंधाचे सादरीकरण आजपर्यंत केले आहे. कला आणि सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित रसिक फाऊंडेशनचे ते संचालक आहेत. डॉ. बाहेगव्हाणकर यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ध्यानी, मनी आणि स्वप्नी फक्त नि फक्त सावरकर पाहणारे

डॉ. बाहेगव्हाणकर खऱ्या अर्थाने सावरकरांच्या विचारांशी समरस झाले आहेत.

[email protected]