आई-वडिलांवर आणि मारुतीरायावर श्रद्धा !

अभिनेता ज्ञानेश पेंढारकर यांची आईवडिलांवर आणि मारुतीरायावर श्रद्धा आहे.

 > आपलं आवडतं दैवत ?

हनुमान आणि आई-वडील ही माझी आवडती दैवतं आहेत.

> त्याचं कौतुक कशा पद्धतीने करता?

देवळात जाणं किंवा स्तोत्र म्हणणं असे कौतुक करतो. त्याच्या स्तोत्राचा फार अनुभव मला आला. लहानपणी ७-८वर्षांचा असताना आमच्याकडे साखरे म्हणून गृहस्थ होते. वयाच्या ८५वर्षापर्यंत ते आमच्या वाढदिवसाला येऊन आमचं कौतुक करायचे. ते माझ्यासाठी हनुमानाचा ड्रेस घेऊन आले होते. मी घातलेले कपडे काढून हनुमान वेश परिधान केला आणि हातात गदा घेऊन संपूर्ण इमारतीत फिरत होतो. का माहीत नाही, पण कुठेतरी मनात मारुतीची ओढ होती, असं वाटतं.

> संकटात तो तुम्हाला कशी मदत करतो, असं वाटतं ?

चमत्कार घडत नाही, पण मानसिक शक्ती मिळाल्याचं जाणवतं. त्याचं दर्शन झालं नाही तर वेगवेगळ्या प्रकारे दर्शन होतच.

> कला आणि भक्तीची सांगड कशी घालता?

मुळात भक्तिभाव असल्याशिवाय कला साध्यच होत नाही. त्याचं कोणत्याही प्रकारचं अवडंबर मी माजवत नाही. पण ज्यावेळी त्याचं जे करतो ते मनापासून करतो.

> तुमच्यातली कला साकारण्याकरिता त्याची कशी मदत होते ?

हनुमान स्वतः गायक आहेत असं पुराणात लिहिलं आहे. त्याची कशी मदत होते हे शब्दात सांगता येण्यासारखं नाही. ही प्रत्येकाच्या मानण्यावरची गोष्ट आहे. त्याला ठरावीक नियम नाहीत. श्रद्धा असावी असं मला वाटते. ती आई-वडील कोणावरही असावी. पुराणातल्या कथा वाचूनही स्फूर्ती मिळते.

> आवडत्या दैवताला प्रार्थना केल्यावर यश मिळालंय, असा प्रसंग?

जे अपेक्षित वाटतं ते यश अजून मिळालेलं नाही, असं वाटतं.

> त्याच्यावर रागावता का ?

हो, कधी कधी खूप प्रयत्न करूनही जेव्हा हवं तसं यश मिळत नाही तेव्हा त्याच्यावर रागावतो. आईशी जसं मी बोलतो, वागतो तसेच बोलणे देवाशी असतं. सगळ्यात आवडतं दैवत माझं आई-वडील आहेत, कारण ते दिसतात, आपल्यावर संस्कार करतात त्यामुळे आम्ही आहोत. आपल्या सगळ्या चुका ते पदरात घेतात.

> तो तुमचे लाड कसे पुरवतो ?

खूप वेळा मला जे हवं असतं ते मला मिळतं.

> दैवताचे कोणते स्वरूप आवडते?

बलशाली स्वरूप आवडतं. आजच्या काळात याच रूपाची मनुष्याला गरज आहे.

> त्याच्यापाशी काय मागता ?

स्त्र्ाया, लहान मुलं, रुग्ण, कलाकार यांच्यासाठी काहीतरी करता यावं. कलेचं सामर्थ्य मागतो.

> त्याची नियमित उपासना कशी करता?

‘भिमरुपी महारुद्रा’ हे स्तोत्र मी रोज ११ वेळा म्हणतो.