प्रणवदांकडून काहीतरी शिका!

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

राफेल लढाऊ विमाने खरेदीप्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पलटवार केला. राष्ट्रीय सुरक्षेच्या हितामुळे ‘राफेल’सारख्या करारांची माहिती सार्वजनिक करता येत नाही. याबाबत काँग्रेस अध्यक्षांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन धडे घ्यावेत. प्रणवदांकडून काही तरी शिकावे असा टोला जेटली यांनी लगावला.

अर्थसंकल्पावरील चर्चेला आज लोकसभेत अर्थमंत्री जेटली यांनी उत्तर दिले. यावेळी जेटली यांनी राहुल गांधींचे नाव न घेता काँग्रेस अध्यक्ष असा शब्द उचारला. काँग्रेसकडून आमच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार शोधला जात आहे. पण काहीच भ्रष्टाचार मिळत नसल्यामुळे राफेल विमान खरेदी कराराचा मुद्दा मांडला गेला आहे. काँग्रेस अध्यक्षांकडून देशाच्या सुरक्षेबाबत गंभीर समझोताच केला जात आहे, असा आरोप जेटली यांनी केला.

प्रणव मुखर्जी जेव्हा संरक्षणमंत्री होते तेव्हा अमेरिकेकडून शस्त्रास्त्र खरेदी केले होते. राष्ट्रीय सुरक्षेच्या हितामुळे कराराची माहिती सार्वजनिक करता येत नाही असे प्रणवदा म्हणाले होते. ए. के. ऍण्टोनी जेव्हा संरक्षणमंत्री होते तेव्हाही इस्रायलबरोबर झालेल्या शस्त्रास्त्र खरेदी कराराची माहिती जाहीर केली नव्हती. जेव्हा असे करार होतात तेव्हा सर्व माहिती जाहीरपणे सांगितली जात नाही. कराराची सर्व माहिती जगजाहीर झाल्यास शत्रूंना शस्त्रांची प्रणाली आणि क्षमतेची माहिती मिळते. काँग्रेस अध्यक्षांना पुढे याबाबत काही माहीत नसेल. त्यांनी प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन धडे घ्यावेत, काहीतरी शिकावे असे जेटली यांनी फटकारले.

काँग्रेस खासदार वेलमध्ये

अर्थमंत्री जेटली यांच्या आरोपांवर राहुल गांधी यांना प्रतिक्रिया द्यायची होती. त्यासाठी ते उभे राहिले, मात्र सभापतींनी परवानगी दिली नाही. त्यामुळे काँग्रेस खासदार संतप्त झाले. वेलमध्ये जाऊन त्यांनी घोषणाबाजी केली.