अरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर

सामना ऑनलाईन । मुंबई

विख्यात लेखक, पत्रकार, अरुण साधू हे मराठी वाङ्मय जगतातील एक प्रमुख नांव आहे. त्यांचे कार्य अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहेत. ‘झिपऱ्या’ ह्या त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आता मराठी चित्रपट येत आहे. अश्विनी दरेकर प्रस्तुत ‘झिपऱ्या’ची निर्मिती रणजीत दरेकर यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन केदार वैद्य यांचे आहे. या चित्रपटाला राज्यशासनाचे संकलन, कलादिग्दर्शन, वेशभूषा हे तीनपुरस्कार जाहीर झाले आहेत तर उत्कृष्ट चित्रपट आणि नृत्यदिग्दर्शन नामांकने जाहीर झालेले आहेत.

‘झिपऱ्या’ च्या पोस्टरवर रेल्वे स्टेशनच्या फलाटावर बसलेली तीन मुले दिसत आहेत. एक जण जिन्यात बसून कशाची तरी वाट बघतोय असे दिसते आहे, तो नेमका कशाचा शोध घेत आहेत हे कळायला मार्ग नाही,एक आपल्याच मस्तीत उभा ठाकलेला आहे, एका जण आपल्याच गुर्मीत टशन देत आहे, त्याच्या हातात बूट पॉलिशची साधने दिसत आहेत. हे तिघे कोण आहेत?रेल्वे स्थानकावर काय करत आहेत? या प्रश्नांची उकल या चित्रपटातून होणार आहे. ज्यांनी ‘झिपऱ्या’ कादंबरी वाचली आणि ज्यांनी नाही वाचली अशा दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांची या पोस्टरमुळे उत्कंठा वाढली आहे.

अरुण साधूंच्या कादंबरीवर आधारीत पटकथा आणि चित्रपटाचे दिग्दर्शन केदार वैद्य यांनी केले असून यामध्ये चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम कुलकर्णी,अभिनेत्री अमृता सुभाष, अमन अत्तार, देवांश देशमुख,नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण तरडे, विमल म्हात्रे, दीपक करंजीकर अशी कलाकारांची तगडी फौज आहे. या चित्रपटाला समित सप्तीसकर, ट्रॉय – अरिफ यांनी संगीत दिले असून अभिषेक खणकर, समीर सामंत यांनी गीते लिहिली आहेत. कला दिग्दर्शक विनायक काटकर, नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव तर डीओपी राजेश नादोने आहेत.

निर्माते रणजीत दरेकर आणि प्रस्तुतकर्त्या अश्विनी दरेकर यांनी यापूर्वी ‘रेगे’ सारखा हृदयस्पर्शी आणि गुन्हेगारीचे वास्तव दाखवणारा चित्रपट सादर करून प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला, आता ‘झिपऱ्या’च्या निमित्ताने एक आशयघन सिनेमा त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. ‘झिपऱ्या’ येत्या २२ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.