नोटाबंदी म्हणजे सरकारची मनी लाँडरिंग स्कीम; भाजप नेते अरुण शौरींचा हल्लाबोल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नोटाबंदी ही तर केंद्र सरकारची मनी लाँडरिंग स्कीम होती. नोटाबंदी करून मोठ्य़ा प्रमाणावर काळा पैसा पांढरा करण्यात आला. केंद्रात अडीच लोकांचे सरकार आहे. केवळ इव्हेंट मॅनेजमेंट केले जात आहेत असा हल्लाबोल भाजप नेते, माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर केला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी नोटाबंदीवरून घाणाघात केल्यानंतर आता शौरी यांनीही स्वपक्षाच्या सरकारच्या धोरणावर टीका केल्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शौरी यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.

शौरी यांचे खडे बोल
एका रात्री पंतप्रधानांनी नोटाबंदी जाहीर केली. हे धाडसी पाऊल असल्याचे वर्णन केले गेले. आत्महत्यासुद्धा हे एक धाडसी पाऊल असते हे लक्षात ठेवा. नोटाबंदी करताना काळा पैसा उघड होईल असे सांगितले, पण ९९ टक्के जुन्या नोटा परत आल्याचे रिझर्व्ह बँकेनेच जाहीर केले आहे. त्यामुळे नोटाबंदी ही मनी लाँडरिंग स्कीम होती. नोटाबंदी करून काळा पैसा पांढरा करण्यात आला हे सिद्ध झाले आहे. नोटाबंदीमुळे दहशतवादी कारवाया कमी होतील असाही दावा केला गेला, पण दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. नोटाबंदीचे खूप दुष्परिणाम अर्थव्यवस्थेवर झाले आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसला. कापड, बांधकामासह अन्य उद्योगांवरही परिणाम झाला. केंद्रातील मोदी सरकार अडीच लोकांचे आहे. एक नरेंद्र मोदी, दोन अमित शहा आणि अर्धा घरातील एक वकील यांचे हे सरकार आहे. हे लोक तज्ञांचे ऐकतच नाहीत. जीएसटी लागू करताना खूप घाई केली. अज्ञानातून जीएसटी लागू केल्याचे मोठे संकट अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाले. जीएसटीचे अर्ज खूप किचकट आहेत. जीएसटीमुळे लहान आणि मध्यम उद्योगांवर थेट परिणाम होत असून विक्रीत घट झाल्याने उत्पन्नालाही फटका बसत आहे.

अमित शहा हे मोठे अर्थतज्ञ
तांत्रिक कारणामुळे सध्या आर्थिक विकास खाली येत असल्याचे वक्तव्य भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्याचा खरपूस समाचार अरुण शौरी यांनी घेतला. अमित शहा हे मोठे अर्थतज्ञ आहेत असा टोला त्यांनी लगावला.