अरुणाचलमध्ये पावसाचे थैमान, सेनेचे रेस्क्यू ऑपरेशन

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आसामपाठोपाठ अरुणाचल प्रदेशमध्येही पावसाने थैमान घातले आहे. अरुणाचलमधील पश्चिमेकडे असणाऱ्या कामेंग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी जमीन खचून भूस्खलन झाल्याने शेकडो लोकं अडकून पडली आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने सेनेला पाचारण केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवानांनी आतापर्यंत २५० पेक्षा जास्त लोकांचा जीव वाचवला आहे. यात ५० लहान मुलांचाही समावेश आहे.

अरुणाचलमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागात भूस्खलानच्या घटना घडल्या आहेत. भूस्खलनामुळे रस्ते बंद होऊन अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. भूस्खलनामुळे अडकून पडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सेना करत आहे.