मुंबईकरांच्या प्रश्नांवर संसदेत आवाज उठवणार आणि समस्या सोडवणारच- अरविंद सावंत

सामना प्रतिनिधी, मुंबई

झोपडपट्टय़ांचा प्रश्न असो, कोस्टल रोडचा असो किंवा जीएसटीचा… मुंबईकरांच्या प्रत्येक प्रश्नावर संसदेत आवाज उठवून ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिलो आणि यापुढेही मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करून ते सोडवणारच, अशी ग्वाही दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांनी आज दिली.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने अरविंद सावंत यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना सावंत यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवरील झोपडीवासीयांचे पुनर्वसन, कोस्टल रोड, महालक्ष्मी आणि करी रोडचा पूल, कफ परेडच्या अग्निकांडातील प्रभावितांना मदत, गिरणी कामगारांना घरे, मेट्रोबाधित गिरगावकरांचे राहत्या जागीच पुनर्वसन अशा आपल्या कामांची यादीच या वेळी सावंत यांनी सादर केली.

अरविंद सावंत यांच्यावर 16 गुन्हे दाखल आहेत, असा आरोप काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांनी केल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, आपल्यावर केवळ एकच गुन्हा दाखल आहे आणि तोही सर्वसामान्यांसाठी केलेल्या आंदोलनाचा असे सावंत म्हणाले. जे घरात बसून राहतात त्यांच्यावर केसेस कशा दाखल होणार, असा टोलाही त्यांनी देवरा यांना लगावला. याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कार्याध्यक्ष संदीप चव्हाण, सुरेश वडवलकर, ज्येष्ठ पत्रकार अजय वैद्य आदी उपस्थित होते.