ओवेसींचा हल्लाबोल, चव्हाणांना खासदारकी, पत्नीला आमदारकी तर भाच्याला …

1

सामना प्रतिनिधी । नांदेड

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी नांदेडला मोंढा मैदानावर सत्ता संपादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या घणाघाती भाषणात काँग्रेसचे नेते आणि खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर जहरी टिका केली.

ओबीसींना वंचित ठेवण्याचा काँग्रेसचा डाव सफल होऊ देणार नाही!

‘अशोकराव चव्हाणांना अपेक्षित लोकशाही अशी आहे की, त्यांना खासदार पद हवे आहे, त्यांच्या पत्नीला आमदार पद हवे आहे, त्यांच्या भाच्याला असेच कुठले तरी महत्वाचे पद हवे आहे. एकंदरीत सर्व पदे आपल्या घरातच रहावीत ही अशोकरावांची लोकशाही विषयीची कल्पना आहे. पण आता ओबीसी, दलित आणि मुस्लिम यांच्या हे लक्षात आले आहे म्हणून त्यांचा हा डाव आता चालणार नाही. या सत्ता संपादन सभेची गर्दी पाहून अशोक चव्हाणांची झोप निश्चितच उडाली आहे. विशेष म्हणजे या सभेत पैशाने आणलेली माणसे नाहीत तर स्वतःचे पैसे खर्च करुन आलेली माणसे आहेत.’

तसेच जर काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी आघाडी करण्यात आमची अडचण वाटत असेल तर आम्ही दूर होतो, पण बाळासाहेब आंबेडकर म्हणतील त्याप्रमाणे समझोता करा. ओवेसींच्या या विधानाचे कौतूक करताना बाळासाहेब म्हणाले की, ओवेसींनी फार मोठ्या मनाने हे विधान केले आहे. असे करायला मर्दाचे काळीज लागते. त्यांनी दाखविलेल्या या मोठेपणाबद्दल मी त्यांचे आभार मानतो.