हिंदुमध्ये होतात सर्वाधिक गर्भपात; असदुद्दीन औवेसी बरळले


सामना ऑनलाईन । हैदराबाद

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी पुन्हा हिंदुविरोधात गरळ ओकली आहे. गर्भपात प्रामुख्याने हिंदुमध्येच होतात. हिंदुमध्ये गर्भपाताचे प्रमाण सर्वाधिक आहे, असे तारेही त्यांनी तोडले आहेत. 2001 मधील जनगणनेच्या आकडेवारीचा दाखला देत आत्महत्या करणाऱ्या महिला, परित्यक्ता किंवा हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या करणाऱ्या महिलांचे प्रमाण हिंदुमध्ये जास्त असल्याचा जावईशोधही त्यांनी लावला आहे. औवेसी यांचे हे विधान महिलाविरोधी आणि महिलांचा अपमान करणारे असल्याची टीका भाजपने केली आहे. तर नेटकऱ्यांनीही औवेसींच्या विधानाचा निषेध करत त्यांना झोडपून काढले आहे.

औवेसी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, 2001 च्या जनगणनेनुसार सर्वाधिक गर्भपात हिंदुमध्ये होत असल्याचे दिसून येते. तसेच आत्महत्या करणाऱ्या, परित्यक्ता आणि निराश्रित महिलांचे प्रमाणही हिंदुमध्ये जास्त आहे. हिंदुमध्ये हुंड्यासाठी महिलांचा छळ करण्यात येतो. त्यामुळे आत्महत्या करणाऱ्या महिलांची संख्याही जास्त आहे. तीन तलाकबाबतच्या सरकारच्या अध्यादेशामुळे मुस्लीम महिलांना कोणताही फायदा होणार नसल्याचे ते म्हणाले आहे.

औवेसी यांच्या या वक्तव्यावरून त्यांची मानसिकता स्पष्ट होते. त्यांचे हे वक्तव्य महिलांविरोधी असून महिलांचा अपमान करणारे असल्याचे तेलंगणाचे भाजप प्रवक्ता कृष्णसागर राव यांनी सांगितले. औवेसी यांना कट्टरवादी विचारसरणीमुळे दृष्टीदोष झाला असून 85 टक्के लोकसंख्येची तुलना ते 15 टक्के लोकसंख्येशी करत आहेत, असेही ते म्हणाले. औवेसी यांच्या वक्तव्याचा निषेध करत नेटकऱ्यांनीही त्यांना चांगलेच फैलावर घेतले. 18 वर्षांपूर्वीच्या आकडेवारीचा दाखला औवेसी आता का देत आहे, असा सवाल एका नेटकऱ्याने केला आहे. तर औवेसी यांची प्रतिगामी विचारसरणी दिसून येत असून हिंदूद्वेषाने ते पछाडले आहेत अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांना झोडपले आहे.