कश्मीर हिंदुस्थानचाच, पाकिस्तानने लुडबूड थांबवावी; ओवैसींनी खडसावले

3

सामना ऑनलाईन । हैदराबाद

कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग होता आणि यापुढेही राहील, पाकिस्तानने कश्मीरप्रश्नी अजिबात लुडबूड करू नये, अशा शब्दांत एआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला खडसावले आहे. तेलंगणा जागृती आंतरराष्ट्रीय युवा नेतृत्व परिषदेच्या शनिवारी झालेल्या एका चर्चेत ते बोलत होते. कश्मीरमधील समस्या हा हिंदुस्थानचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यात पाकिस्तानने ढवळाढवळ करू नये. कश्मीरच्या युवकांना चिथावणी देण्याचे कारस्थान थांबवण्याचे आवाहनही त्यांनी केले. कश्मीर आणि तेथील युवक हे हिंदुस्थानचे अविभाज्य भाग आहे, हे पाकिस्तानने लक्षात ठेवावे, असे ते म्हणाले.

कश्मीर प्रश्न हा जेम्स बॉण्ड किंवा रॅम्बो स्टाईलने सोडवता येण्यासारखा नाही, तर त्यासाठी धोरणात्मक दृष्टिकोन आखायला हवा असे ते म्हणाले. मात्र, कश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी, काँग्रेस आणि भाजपा दोघांकडेही निश्चित असे धोरण आणि दूरदृष्टी नाही अशी टीका त्यांनी केली. कश्मीरी पंडितांवर अन्याय होत असून त्यांचा प्रश्न कुणालाही सोडवता आला नाही, त्यांना न्याय मिळायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ओवैसी यांनी याआधीही पाकिस्तानला फटकारले आहे.