आषाढीसाठी पंढरीत वारकऱ्यांची रीघ, दर्शनरांग गोपाळपूरपर्यंत पोहचली

सामना ऑनलाईन, पंढरपूर

आषाढी वारीचा सोहळा अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. देहू-आळंदी येथून निघालेल्या पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. दरम्यान, विविध राज्यांतून निघालेल्या पालख्या आणि दिंड्या पंढरीत दाखल होत असल्याने पंढरपूरनगरी वारकऱ्यांनी गजबजून गेली आहे.

वारकरी चंद्रभागेचे स्नान करून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी करीत असल्याने दर्शनरांग गोपाळपूर पत्राशेडपर्यंत पोहचली आहे. रांगेत दीड लाखाहून अधिक भाविक उभे असून दर्शनासाठी १२ तासांचा अवधी लागत आहे.