अॅशेस: चौथी कसोटी अनिर्णित; स्मिथचे शतक, गावस्करांचा विक्रम अबाधित

14

सामना ऑनलाईन । मेलबर्न

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. मेलबर्नमध्ये झालेल्या या सामन्यात पाचव्या दिवशी सामना संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ४ बाद २६३ एवढी मजल मारली. चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला असला तरी ऑस्ट्रेलियाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले तीन सामने जिंकत मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव कालच्या २ बाद १०३ धावांवरून पुढे सुरू केला. काल नाबाद असलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाबाद १०२ , तर सलामीवीर वॉर्नरने ८६ धावा केल्या. इंग्लंडकडून पहिल्या डावात नाबाद २४४ धावांची खेळी करणाऱ्या कुकला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

स्मिथचे विक्रमी शतक
मेलबर्नमध्ये चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी स्मिथने १६१ चेंडूत कारकिर्दीतील २३ वे शतक पूर्ण केले. स्मिथने सर्वात कमी डावात २३ शतक पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. स्मिथने शतकांचा हा आकडा ११० डावांमध्ये पूर्ण केला. पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचे महान खेळाडू डॉन ब्रॅडमन (५९ डाव) आहेत, तर दुसऱ्या स्थानावर हिंदुस्थानचे सुनील गावस्कर (१०९ डाव) आहेत.

२०१७मध्ये सर्वाधिक धावा
स्मिथने या शतकी खेळीसह २०१७मध्ये कसोटीमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम केला. यंदाच्या वर्षी स्मिथने ७६.७६च्या जबरदस्त सरासरीने एकूण १३०५ धावा ठोकल्या आहेत.

पाँटिंगच्या विक्रमाची बरोबरी
मेलबर्नमध्ये स्मिथने २०१७मधील कसोटी सामन्यातील ६वे शतक ठोकले. या शतकासह त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या विक्रमाची बरोबरी केली. पाँटिंगच्या नावावर सलग दोनदा एका वर्षात ६ कसोटी शतकं ठोकण्याचा विक्रम आहे.

आपली प्रतिक्रिया द्या