कोकणातील प्रस्तावित रिफायनरी विदर्भात आणा- आशीष देशमुख

सामना ऑनलाईन । मुंबई

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढती बेरोजगारी आणि विस्तीर्ण निर्जन प्रदेश पाहता राज्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प विदर्भात आणावा अशी मागणी आज भाजपचे बंडखोर आमदार आशीष देशमुख यांनी केली. देशमुख यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

यासंदर्भात आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षभरापासून कोकणातील नाणार येथील नियोजित रिफायनरी प्रकल्पावरून राज्यातील वातावरण तापले आहे. कोकणात हा प्रकल्प होणार नसेल तर विदर्भात हा प्रकल्प आणावा असे आमदार देशमुख यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

नागपूरजवळील काटोल भागातील औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर हा प्रकल्प होऊ शकतो. त्या ठिकाणी १५ हजार एकर जमीन उपलब्ध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर विदर्भ इकॉनॉमिक फोरमच्या व्यापाऱ्यांनी यासंदर्भात दिल्लीत अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांचीही भेट घेतली असून गीते यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे देशमुख यांनी सांगितले.