दलबदलू लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत! अशोक चव्हाण यांचा नारायण राणेंना टोला

सामना प्रतिनिधी, मुंबई

काही लोक दलबदलू असतात. ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज नारायण राणेंना लगावला. राणे भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. त्याबद्दल पत्रकारांनी चव्हाण यांना बोलते केले.

चव्हाण म्हणाले, काँग्रेसमधून कुणी बाहेर पडले तर नवीन लोकांना संधी मिळेल. काही लोक वर्षानुवर्षे एकाच जिल्ह्यात एकाच पदावर चिकटून असतात. पद सोडत नसल्याने इतरांना संधी मिळत नाही. सर्वांच्याच बाबतीत हे लागू पडत नाही. पण काही लोक हे सत्तेशिवाय राहूच शकत नाहीत, त्याला काय करणार? असा सवाल करून भाजपमध्ये कुणी गेले म्हणून काहीच फरक पडत नाही, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

भाजपचा खरेदी-विक्री संघ झाला आहे!
भाजपचा सध्या खरेदी-विक्री संघ झाला आहे. कोणतीही आयडॉलॉजी उरलेली नसल्याने जो येईल त्याला पक्षात प्रवेश दिला जात आहे. ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ असाच प्रकार भाजपात सुरू असून निवडणुकांच्या तोंडावर कुणी जर त्यांच्यासोबत गेले तरीही काँग्रेसला नुकसान होणार नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले. कोण उपयुक्त आणि कोण नाही याचा सारासार विचार न करताच भाजपात सध्या इनकमिंग सुरू असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.

चव्हाण यांनी मराठा आरक्षण व बैलगाडा शर्यतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, राज्य सरकार न्यायालयीन लढाईत कमी पडत आहे. सरकारला आपली भूमिका नीट मांडता आलेली नाही. जर तामीळनाडूत जलिकट्टूला परवानगी मिळू शकते तर महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला का नाही?