हीच ओळख अभिमानाने मिरवतो! : आशुतोष पत्की

>>नितीन फणसे<<

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्कींचा मुलगा आशुतोष पत्की. घरात संगीताची पार्श्वभूमी असतानाही अभिनयाची आवड जोपासतोय

आशुतोष पत्की… ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा. वडील संगीतकार असले तरी आशुतोष मात्र अभिनेता बनला आहे. चारेक वर्षांपूर्वी ‘अकल्पित’ नावाच्या सिनेमात छोटीशी भूमिका केल्यानंतर आता या वर्षी ‘वन्स मोअर’ या मराठी सिनेमात तो नायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतोय. मध्यवर्ती भूमिका साकारायला मिळाली याचा निश्चितच त्याला आनंद झाला आहे. पण वडिलांसारखी प्रसिद्धी आणि त्यांना लोकांकडून मिळणारा आदर आपल्यालाही मिळावा, अशी त्याची इच्छा आहे. ‘वन्स मोअर’ या आपल्या सिनेमाबाबत बोलताना आशुतोष म्हणतो, ‘‘ज्यात खूप काही करता येईल अशा एखाद्या भूमिकेच्या शोधात मी होतो. चांगलं कथानक, चांगली स्टारकास्ट असं सगळंच मला हवं होतं. या सिनेमाची कथा ऐकली तेव्हा मला ती खूप आवडली. कारण या एकाच सिनेमात मला दोन व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्या. एक फार पूर्वीचा राजा आहे, तर एक आजच्या काळातला तरुण… या दोघांची वागण्याबोलण्याची सगळी शैली वेगळी आहे. त्यामुळे एक अभिनेता म्हणून मला हा प्रोजेक्ट खूप आवडला.’’

अशोक पत्की हे नाव मराठी सिनेमा इंडस्ट्रीत खूप आदराने घेतलं जातं. म्हणूनच त्यांचा मुलगा अशीच आज तरी आशुतोषची ओळख आहे. स्वतःची ओळख व्हावी असं त्याला नक्कीच वाटत असणार… असे विचारता तो म्हणाला, ‘‘हो तर… नक्कीच. माझी तशीच इच्छा आहे. पण अशोक पत्की यांचा मुलगा म्हणून माझी जी ओळख आहे तीही मला आवडते. कारण आज बाबांसोबत कुठेही गेलो तेव्हा बरेच अनोळखी लोक त्यांच्याशी, माझ्याशी आपुलकीने बोलतात, आम्हाला आदराची वागणूक देतात ते मला खूप आवडते. बाबा नुसतेच प्रसिद्ध नाहीत, त्यांना आदरही मिळतो. तो मलाही मिळावा असं वाटतं.’’

मालिका करायला आवडते की सिनेमा? असा जरा वेगळा प्रश्न विचारला तेव्हा आशुतोष हसून म्हणतो, ‘‘हे पहा… काम हे शेवटी कामच असते. पण त्यातूनही निवडायचंच झालं तर मी सिनेमा निवडेन. सिनेमा करायला मला जास्त मजा येते. कारण मालिकेचं काम घाईघाईत होतं. तिकडे कमी वेळेत टार्गेटने काम पूर्ण करावं लागतं. पण भूमिकेची तयारी करून ती साकारायची असते. ते सिनेमात करायला मिळतं. कारण पटकथा तयार असते. त्यानुसार तुमच्या भूमिकेवर तुम्हाला काम करता येतं. महिना-दोन महिने मिळतात.’’

अभिनयाचं रीतसर शिक्षण

वडील या इंडस्ट्रीत आहेत म्हणून त्यांच्या बळावर आशुतोषने सिनेमात प्रवेश केलेला नाही. त्याने अनुपम खेर फिल्म ऍकॅडमीत अभिनयाचं रीतसर शिक्षण घेतलंय. तो कोर्स पूर्ण केल्यावर सिनेमा मेकिंग जाणून घेण्यासाठी त्याने एक वर्ष केदार शिंदेंचा सहाय्यक म्हणून काम केले. ‘मधु इथे आणि चंद्र तिथे’ आणि ‘श्रीमंत दामोदर पंत’ या दोन प्रोजेक्टमध्ये तो केदार शिंदेंचा सहाय्यक होता. कॅमेरामन काय करतो, दिग्दर्शकाचं काम काय… हे सगळं जाणून घेतलं. या माहितीचा फायदा नंतर अभिनयात होईल हे त्याला माहीत होतं. म्हणूनच त्यानंतर ‘मेंदीच्या पानावर’ ही पहिली मालिका करताना आणि अलीकडे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘दुर्वा’ मालिका करताना त्याला विशेष मेहनत घ्यावी लागली नाही. आताही ‘वन्स मोअर’ हा पहिला सिनेमाही तो बिनदिक्कत करू शकला.

वन्स मोअरखरंच वेगळा

प्रत्येक नवीन अभिनेता आपला पहिला सिनेमा खूपच वेगळा असल्याचं सांगतोच. आशुतोषही त्याहून वेगळा नाही. पण तरीही तो ‘वन्स मोअर’ हा सिनेमा का वेगळा ते नीट स्पष्ट करून सांगतो. तो म्हणतो, या सिनेमाचे कथानक कर्मावर आधारलेले आहे. यात माझी एक व्यक्तिरेखा ४ हजार वर्षांपूर्वीची आहे, तर दुसरी व्यक्तिरेखा आजच्या काळातल्या तरुणाची आहे. प्रेक्षकांना हे दोन्ही काळ आम्ही दाखवले आहेत. आपल्या भूतकाळाशी आपले लागेबांधे असतात. ते कसे ते या सिनेमात आम्ही दाखवलं आहे.