महिलेला मारण्यात कसलं पुरुषत्व? अश्विनी बिंद्रे यांच्या वडिलांना अश्रू अनावर

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी-बिंद्रे गोरे हत्याकांड प्रकरणी सुरू असलेल्या तपासावर त्यांच्या कुटुंबीयांनी शंका व्यक्त केली आहे. अश्विनी यांचे भाऊ आनंद बिंद्र आणि त्यांचे पती राजू गोरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती मीडियाला दिली. तर अश्विनी यांच्या वडिलांना बोलताना अश्रू अनावर झाले. एखाद्या महिलेला मारण्यात कसलं पुरुषत्व?, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

अश्विनी यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की ज्या पद्धतीने सरकार हे प्रकरण हाताळत आहे, त्यावरून सरकारवर शंका येते. पहिले कारण म्हणजे हे हत्याकांड बाहेर आल्यापासून मुख्यमंत्री ते वरिष्ठ पोलीस अधिकारी कुणीही कुटुंबीयांची भेट घेतली नाही. तसेच पोलिसांच्या तपासाच्या दिरंगाईबाबत शासनस्तरावर ऑगस्ट २०१६मध्ये निवेदन दिले, त्या निवेदनाचे काय झाले याचे साधे उत्तर देखील आपल्याला मिळाले नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. ९ जानेवारी २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांना भेटण्यास गेलो असता ते सचिवांकडे बोट दाखवून निघून गेले, असेही कुटुंबीयांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपत आला आहे, त्यांची नियुक्ती या तपासासाठी करण्यात येते आणि उच्च न्यायालय जोपर्यंत आदेश देत नाही तोपर्यंत तपास पुढे जात नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. सरकारच्या अशा धोरणांमुळे त्यांच्या तपासाच्या हेतूवर शंका निर्माण होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच त्यांनी सरकारकडे मागण्याही केल्या आहेत. यामध्ये सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा, अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली आहे. कारण पोलीस अधिकारी पुराव्यांची छेडछाड करू शकतात, साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात, असा त्यांचा संशय आहे. सोबतच सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी देखील मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

एसीपी संगीता शिंदे-अल्फान्सो यांची नियुक्ती ही तपास पूर्ण होऊन चार्जशीट दाखल होईपर्यंत असणे गरजेच आहे, असं देखील त्यांनी म्हटले आहे. यासोबतच सदर तपासात आरोपीचा भाऊ संजय कुरूंदकर हा ढवळाढवळ करत आहे, त्यावर कारवाईचे आश्वासन देऊनही कारवाई करण्यात आलेली नाही, तेव्हा ही कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.

अश्विनी यांच्या वडिलांना अश्रू अनावर, पाहा काय म्हणाले