हिंदुस्थानची विजयी सलामी, आशिया कप हॉकी स्पर्धा

सामना प्रतिनिधी, ढाका

हिंदुस्थानच्या हॉकी संघाने आशिया कप हॉकी स्पर्धेत शानदार सलामी दिली. हिंदुस्थानच्या संघाने सांघिक खेळाच्या जोरावर जपानचा ५-१ अशा फरकाने धुव्वा उडवला. आता येत्या शुक्रवारी होणाऱ्या दुसऱ्या लढतीत हिंदुस्थानला यजमान बांगलादेशचा सामना करावयाचा आहे.

हिंदुस्थानकडून एस. व्ही. सुनीलने तिसऱ्या मिनिटाला गोल करीत धडाकेबाज सुरुवात करून दिली. पण चौथ्या मिनिटालाच केनजी किताजातोने जपानसाठी गोल करीत १-१ बरोबरी साधून दिली. त्यानंतर ललित उपाध्यायने २२ व्या आणि रमणदीप सिंगने ३३ व्या मिनिटाला गोल करीत हिंदुस्थानला आघाडी मिळवून दिली. हरमनप्रीत सिंगने ३५ व ४८व्या मिनिटाला गोल करीत हिंदुस्थानच्या महाविजयावर शिक्कामोर्तब केले.

हिंदुस्थानी हॉकीपटूंच्या आक्रमणासमोर जपानच्या खेळाडूंची डाळ शिजली नाही. शूएर्ड मरीन यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानी हॉकी संघ पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेत सहभागी होत आहे. पहिल्याच प्रयत्नात या संघाने घवघवीत यश संपादन केले असून या विजयासह तीन गुणांचीही कमाईही केली.