अपरिचित खेळ एशियाडमधील

नवनाथ दांडेकर,[email protected]

एशियाड क्रीडा स्पर्धेत यंदा अनेक अपरिचित खेळांचा पहिल्यांदाच समावेश केला गेला आहे. पाहूया या खेळांविषयी…

इंडोनेशियाच्या जाकार्तातील 18 वी आशियाई क्रीडा स्पर्धा हिंदुस्थानी क्रीडा क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरावी अशीच ठरली आहे. हिंदुस्थानी खेळाडूंनी या स्पर्धेत कब्बडी , हॉकी ,टेनिस या आपल्या परंपरागत खेळात हवे तसे यश मिळवले नाही .पण कुराश, वुशू ,इक्वेस्ट्रीयन ( घोडेस्वारी ),हेप्टाथलॉन आणि ब्रिज या आपल्यासाठी काहीशा अपरिचित खेळांत मर्दुमकी गाजवत ऐतिहासिक पदके देशासाठी आणली. ब्रिजमधील सुवर्णपदक,हेप्टाथलॉनमधील सुवर्ण आणि घोडेस्वारीतील दोन रौप्यपदकांनी हिंदुस्थानला आठव्या आसामानवर नेऊन ठेवले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात 15 सुवर्ण ,20 रौप्य आणि 30 कास्यपदकांसह एकूण 69 पदके मिळवून आपल्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद हिंदुस्थानी चमूने केली.या कामगिरीत आपल्याला अपरिचित असणाया वुशू ,कुराश, ब्रिज ,हेप्टाथलॉन आणि घोडेस्वारीत मिळवलेल्या पदकांचा खारीचा वाट आहे हे सर्वाना मान्य करावेच लागेल.

हेप्टाथलॉन हा ऍथलेटिक्स क्रीडा प्रकारातील एक खेळ.या खेळात खेळाडूला सात प्रकारात आपले कौशल्य दाखवावे लागते.त्यात भालाफेक,गोळाफेक ,उंच उडी ,लांब उडी ,200 मीटर्स दौड ,800 मीटर्स दौड आणि 100 मीटर्स दौड अशा शर्यतींचा समावेश असतो. हिंदुस्थानी खेळाडूंसाठी हा क्रीडाप्रकार तसा नवखा आणि अवघडच म्हणावा लागेल. 1980 पासून या खेळाच्या स्पर्धेत महिला गटाचाही समावेश करण्यात आला. जकार्ता एशियाडमध्ये पश्चिम बंगालची ऍथलिट स्वप्ना बर्मनने महिला गटाचे सुवर्णपदक पटकावले.

इक्वेस्ट्रीअन

इक्वेस्ट्रीअन म्हणजेच घोडेस्वारी हा तसा परंपरागत क्रीडा प्रकार.ब्रिटिशांनी या खेळात विविधता आणून त्याचे स्वरूप स्पर्धात्मक केले. या प्रकारातील जम्पिंग हा घोडयावरून अडथळे पार करण्याचा प्रकार अतिशय लोकप्रिय ठरला आहे. याच प्रकारात हिंदुस्थानच्या फौवाद मिर्झाने वैयक्तिक गटात 26.20 दोषांकासह देशासाठी रौप्यपदक आणले.

कुराश आणि वुशू

कुराश हा तुर्की कुस्तीप्रकार आहे.या कुस्तीत मल्ल प्रतिस्पर्ध्याच्या कंबरेला बांधलेला टॉवेल पकडून त्याला उचलून फेकण्याचा प्रयत्न करतात .यात प्रतिस्पर्ध्याला पाठीवर पूर्ण ताकदीनिशी वेगाने आपटण्याच्या प्रकाराला हलाल म्हणतात.हलाल यशस्वी करणाया मल्लाला तात्काळ विजयी घोषित करण्यात येते. या प्रकारात तुर्की ,मंगोलिया,चीन आणि रशिया या देशांच्या खेळाडूंची हुकूमत आहे.

.दिल्लीच्या नेब साराय गावच्या पिंकी बलहाराने महिलांच्या कुराश ( 52 किलोग्रॅम) गटात देशासाठी पहिले रौप्यपदक पटकावले तर बेळगावच्या मल्लप्रभा जाधवने आपला मराठमोळा हिसका दाखवीत याच गटात देशासाठी कांस्यपदक जिंकले.

आशियाई स्पर्धेच्या इतिहासात हिंदुस्थानने यंदा सेपक टकरो म्हणजेच किक व्हॉलीबॉल खेळात पहिलेच पदक पटकावले.जकार्ता एशियाडमध्ये हिंदुस्थानी पुरुष संघ उपांत्य लढतीत गट विजेत्या थायलंडकडून पराभूत झाला.पण उपांत्य फेरी गाठल्याने हिंदुस्थानाला कांस्यपदक पटकावता आले आहे ,

ब्रिजमध्ये सोनेरी ‘ब्रिज’ उभारला

ब्रिज म्हणजे केवळ पत्त्यांचा डाव हा समाज खोटा ठरवत हिंदुस्थानच्या प्रणव वर्धन आणि शिबनाथ सरकार या जोडीने पुरुष पेअर गटात सुवर्णपदक पटकावले.1951 नंतर प्रथमच या खेळात हिंदुस्थानने सोनेरी पदक मिळवण्याचा भीमपराक्रम साकारला आहे. बुद्धिबळाइतकाच हा बुद्धीचा खेळ आहे असा संदेश 60 वर्षीय सुवर्णपदक विजेते वर्धन यांनी हिंदुस्थानी युवकांना दिला.