आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप शिवा थापा, सरिता देवीचे पदक पक्के

1

सामना ऑनलाईन,बँकॉक

हिंदुस्थानच्या शिवा थापाने मंगळवारी आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरीत धडक देत सलग चौथ्यांदा आपले पदक पक्के केले. याचबरोबर अनुभवी बॉक्सर एल. सरिता देवी हिनेही दशकभरानंतर या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवले.

जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत कास्यपदक जिंकणाऱ्या आसामच्या 25 वर्षीय शिवा थापाने लाइटवेट (60 किलो) गटातील एकतर्फी लढतीत थायलंडच्या रुजाकर्ण जुनत्रोंग याचा 5-0 गुणफरकांनी धुव्वा उडवला. आता उपांत्य लढतीत शिवापुढे कझाकिस्तानच्या जाकिर सफिउल्लीनचे कडवे आव्हान असेल. याच सफिउल्लीनने 2015च्या स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती. दोन वेळच्या राष्ट्रीय चॅम्पियन असलेल्या शिवा थापाने 2013 च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण, 2015 मध्ये कास्य व 2017 मध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती.

माजी जगज्जेत्या सरिता देवीने उपांत्यपूर्व लढतीत कझाकिस्तानच्या रिम्मा वोलोस्सेंको हिला हरवून हिंदुस्थानचे आणखी एक पदक पक्के केले. 37 वर्षीय  सरिता देवीने 2010 मध्ये या स्पर्धेत सोनेरी यश संपादन केले होते.

निखात झरीन हिने दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या नझीम कायझायबे हिला 51 किलो वजनी गटात पराभूत करीत मोठा उलटफेर केला. या स्पर्धेत हिंदुस्थानच्या सात पुरुषांनी आणि सहा महिलांनी उपांत्य फेरीत धडक मारून पदक पक्के केले.