पुरुषांपाठोपाठ महिला कबड्डीतही पराभव, सुवर्णपदक हुकले

सामना ऑनलाईन । जकार्ता

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांपाठोपाठ महिला कबड्डीतही हिंदुस्थानला पराभवाचा धक्का बसला असून हक्काचे सुवर्णपदक हुकले आहे. शुक्रवारी झालेल्या महिला कबड्डीच्या अंतिम सामन्यात इराणने हिंदुस्थानचा 27-24 असा पराभव केला आणि सुवर्णपदक पटकावले. हिंदुस्थानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

चांगली सुरुवात पण…
अंतिम सामन्यामध्ये महिला कबड्डी संघाने चांगली सुरुवात केली होती. पहिल्या हाफमध्ये इराणवर दबाव निर्माण करत एक-एक पॉईंट घेत हिंदुस्थान आपली आघाडी वाढवत होता. पहिल्या हाफपर्यंत हिंदुस्थान 13-11 असा आघाडीवर होता. परंतु दुसऱ्या हाफमध्ये इराणच्या महिलांनी पलटवार करत हिंदुस्थानला ऑल आऊट करत आघाडी मिळवली. हिंदुस्थानने अखेरच्या काही मिनिटांमध्ये सामन्यात पुनरागमन करण्याचा नेटाने प्रयत्न केला परंतु त्यात यश आले नाही. अखेर हिंदुस्थानचा 27-24 असा पराभव झाला आणि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

हिंदुस्थानची ‘नौका’ पार… पटकावलं 1 सुवर्ण, 2 कांस्य

याआधी पुरुषांच्या कबड्डीमध्ये देखील हिंदुस्थानला इराणच्या हातून पराभव स्वीकारावा लागला होता. उपांत्यफेरीच्या सामन्यात इराणने हिंदुस्थानचा 27-18 अशा मोठय़ा फरकाने पराभव केला. यामुळे हिंदुस्थानला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

हिंदुस्थानचा षटकार! टेनिसमध्येही सुवर्ण

आशियाई क्रीडा स्पर्धेत 1990 पासून कबड्डीला स्थान मिळाले. तेव्हापासून हिंदुस्थानने झालेल्या सातही स्पर्धांत सुवर्णपदकांची कमाई केलेली आहे. मात्र कबड्डीमध्ये नवी शक्ती म्हणून उदयास आलेल्या इराणच्या संघाने यंदा इतिहास रचत अंतिम फेरी गाठली.