थोडासा इतिहास

बाळ तोरसकर,[email protected]

सध्या आशियाई स्पर्धांचा गाजावाजा सुरू आहे… काय आहे याचा इतिहास…

आशियाई स्पर्धा दर चार वर्षांनी होत असली तरी या स्पर्धेची सुरुवात हिंदुस्थानात झाली असल्याचे काहींना माहीत नसेल. ऑलिम्पिक स्पर्धेनंतर सर्वाधिक सहभाग असलेली स्पर्धा असा या स्पर्धेचा लौकिक आहे. या स्पर्धेची सुरुवात 1951 साली हिंदुस्थानची राजधानी नवी दिल्ली येथे 4 ते 11 मार्च या कालावधीत झाली होती. आठ दिवस चाललेल्या या स्पर्धेत 11 देशांनी सहभाग नोंदवला होता. त्यावेळी या स्पर्धेत 6 मुख्य खेळांच्या 57 खेळ प्रकारांत 489 खेळाडूंनी भाग घेतला होता. ही स्पर्धा आशियाई ऑलिम्पिक समिती आयोजित करते, जी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला संलग्न आहे. या स्पर्धेत जपान 24 सुवर्ण, 21 रौप्य व 15 कास्य पदकांसह एकूण 60 पदके मिळवत अव्वल स्थानी होता तर हिंदुस्थान 15 सुवर्ण, 16 रौप्य व 20 कास्य पदकांसह एकूण 51 पदके मिळवत दुसऱया स्थानी राहिला होता. एकूण 8 देशांनी पदक तालिकेत स्थान मिळवले होते.

दुसरी आशियाई स्पर्धा 1954 साली फिलिपाईन्स येथील मनाली येथे 1 ते 9 मे या कालावधीत पार पडली होती. नऊ दिवस चाललेल्या या स्पर्धेत 19 देशांनी सहभाग नोंदवला होता व 8 मुख्य खेळांच्या 76 खेळ प्रकारांत 970 खेळाडूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेतसुद्धा जपानने 38 सुवर्ण, 36 रौप्य व 24 कास्य पदकांसह एकूण 98 पदके मिळवत अव्वल प्राप्त केले होते तर हिंदुस्थान 5 सुवर्ण, 4 रौप्य व 8 कास्य पदकांसह एकूण 17 पदक मिळवत पाचव्या स्थानी राहिला होता. पहिल्यांदाच सहभागी होत पाकिस्तानने 5 सुवर्ण, 6 रौप्य व 2 कास्य पदकांसह एकूण 13 पदके मिळवत चौथे स्थान पटकवताना हिंदुस्थानवर कुरघोडी केली होती. फिलिपाईन्स व दक्षिण कोरिया हे देश अनुक्रमे 45 व 19 पदकांसह दुसऱया व तिसऱया स्थानी विराजमान होते. या स्पर्धेत 13 देशांनी पदकांना गवसणी घातली होती.

जपानच्या टोकियो शहरात तिसरी आशियाई स्पर्धा 24 मे ते 1 जून 1958 साली संपन्न झाली होती. ही स्पर्धासुद्धा नऊ दिवस चालली व या स्पर्धेत 16 देशांनी सहभाग नोंदवत 13 मुख्य खेळांच्या 97 खेळ प्रकारांत 1820 खेळाडूंनी भाग घेतला होता. हॉकी, टेनिस, टेबल टेनिस व व्हॉलीबॉल या खेळांसाठी या स्पर्धेत प्रथमच स्थान देण्यात आले होते. या स्पर्धेत सलग तिसऱया वेळी प्रथम स्थान पटकवताना जपानने 67 सुवर्ण, 42 रौप्य व 30 कास्य पदकांसह एकूण 139 पदके मिळवत प्रथमच पदकांची शंभरी पार केली, तर हिंदुस्थान आपल्या ढिसाळ कामगिरीत भर घालताना 5 सुवर्ण, 4 रौप्य व 4 कास्य पदकांसह एकूण 13 पदके मिळवत सातव्या स्थानी घसरला होता. पाकिस्तानने पुन्हा एकदा हिंदुस्थानवर कुरघोडी करताना 6 सुवर्ण, 11 रौप्य व 9 कास्य पदकांसह एकूण 26 पदक मिळवत सहावे स्थान पटकावले होते. या स्पर्धेत फिलिपाईन्स, दक्षिण कोरिया, इराण व चीन प्रजासत्ताक हे अनुक्रमे दुसऱया ते पाचव्या स्थानी राहिले होते. या स्पर्धेत 16 देशांनी पदक तालिकेत स्थान पटकावले होते.

चौथ्या आशियाई स्पर्धेची जबाबदारी इंडोनेशियाने घेत ही स्पर्धा 24 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 1962 या कालावधीत पार पाडली. बारा दिवस चाललेल्या या स्पर्धेत 16 देशांनी सहभाग नोंदवत 13 मुख्य खेळांच्या 88 खेळ प्रकारांत 1460 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत अरब देश व चीनच्या दबावामुळे इस्रायल व तैवान या देशांना स्पर्धेपासून दूर ठेवण्यात आले, तर बॅडमिंटन या खेळाचा समावेश प्रथमच या स्पर्धेत केला गेला.

पाचवी आशियाई स्पर्धा थायलंडच्या बँकॉक या शहरात 9 ते 20 डिसेंबर 1966 या कालावधीत 12 दिवसांत पार पडली. या स्पर्धेत 16 देशांनी सहभाग नोंदवत 14 मुख्य खेळांच्या 143 खेळ प्रकारांत 1945 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत इस्रायल व तैवान या देशांचा पुन्हा समवेश करण्यात आला. जपानने या स्पर्धेतसुद्धा पदक तालिकेत अव्वल स्थान ठेवताना 78 सुवर्ण, 53 रौप्य व 33 कास्य पदकांसह एकूण 164 पदके आपल्या खिशात घातली, तर हिंदुस्थानने पुन्हा एकदा निराशा करताना पाचवे स्थान मिळवत 7 सुवर्ण, 3 रौप्य व 11 कास्य पदकांसह एकूण 21 पदके मिळवली.

सहावी आशियाई स्पर्धा होणार की नाही हे तळ्यात मळ्यात असताना पुन्हा एकदा थायलंडच्या बँकॉक या शहरात 9 ते 20 डिसेंबर 1970 या कालावधीत पार पडली. या स्पर्धेचे यजमानपद दक्षिण कोरियाच्या सोल शहराला मिळाले होते, परंतु त्यावेळी आर्थिक गोत्यात सापडल्यामुळे सोलने ही स्पर्धा आयोजित करण्यास नकार दिला होता. त्यामुळे या स्पर्धेत खंड पडू नये म्हणून गत यजमान बँकॉकने ही स्पर्धा आयोजित करण्याची तयारी दर्शवली व या स्पर्धेवरचे सावट दूर झाले.