असीम मुनीर पाकिस्तानी आयएसआयचे नवीन बॉस

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

हिंदुस्थानविरोधी कारवायात अग्रेसर असणाऱ्या आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विभागाकडून ही माहिती देण्यात आली. मुनीर याआधी लष्कराच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख होते. नुकतीच त्यांना लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्या अध्यक्षतेखालील आर्मी प्रमोशन बोर्डाने लेफ्टनंट जनरलपदी बढती दिली होती.

मुनीर लेफ्टनंट जनरल नावीद मुख्तार यांची जागा घेणार आहेत. मुख्तार डिसेंबर 2016 पासून आयएसआयचे प्रमुख होते. नवे आयएसआयप्रमुख असीम मुनीर कमांडरही होते. पाकिस्तानी लष्करातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पाकिस्तानात लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार सत्तेवर असले तरी मुख्य सत्ताकेंद्र हे लष्कर आणि आयएसआयच असल्याने मुनीर यांच्या कारकीर्दीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

हिंदुस्थानद्वेष हेच आयएसआयचे मुख्य लक्ष्य
पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय धोरण आणि निर्णयांमध्ये आयएसआयची भूमिका नेहमीच महत्वाची मानली जाते. आतापर्यंत हिंदुस्थानात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये आयएसआयचा हात असल्याचे उघड झाले आहे. कश्मीरसह हिंदुस्थानच्या अन्य भागांमध्ये अस्थितरता कशी निर्माण करता येईल त्यासाठी आयएसआयचे नेहमीच प्रयत्न सुरु असतात. पाकिस्तानचा मुख्य शत्रू हिंदुस्थानच असल्याचे गृहीत धरून हिंदुस्थानाला डोळयासमोर ठेऊन आयएसआय आपले धोरण ठरवते.