बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या पोस्टरवर आसिया अंद्राबीचा फोटो

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमधील अनंतनाग जिल्हयात सरकारतर्फे लावण्यात आलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या पोस्टरवरुन वाद निर्माण झाला आहे. या पोस्टरवर देशातील नामांकित महिलांबरोबरच फुटीरतावादी नेत्या व दुख्तराने मिल्लत या संघटनेची प्रमुख आणि दहशतवादी हाफिज सईदची निकटवर्तीय आसिया अंद्राबीचाही फोटो झळकवण्यात आला आहे.

या पोस्टरवर जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती, माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी, अंतराळवीर दिवंगत कल्पना चावला, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, टेनिस स्टार सानिया मिर्जा, माजी महिला आयपीएस अधिकारी व पुद्दुच्चेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांचे फोटो लावण्यात आले आहेत. या फोटोंसोबतच फुटीरतावादी नेता व जम्मू-कश्मीरमध्ये महिलांसाठी दुख्तराने मिल्लत नावाची संघटना चालवणाऱ्या आसिया अंद्राबीचाही फोटो लावण्यात आला आहे.

आसियाचे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांशी संबंध असून ती हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी आशिक हुसैनची पत्नी आहे. जवानांवर दगडफेक करण्यास कश्मीरी तरुणांना चिथावणी दिल्याचा आरोप आसियावर आहे. कश्मीरमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकवत हिंदुस्थानविरोधी घोषणा दिल्याचाही तिच्यावर आरोप आहे. आसिया मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याच्या संपर्कात असून सध्या सुरक्षेच्या कारणास्तवर तिला तुरुंगात ठेवण्यात आले आहे. हे माहित असूनही आसियाचे फोटो पोस्टरवर लावण्यात आल्याने कश्मीरमध्ये खळबळ उडाली आहे.