आई-वडिलांची जबाबदारी नाकारणाऱ्या मुलाचा पगार १५ टक्के कापला जाणार

सामना ऑनलाईन । दिसपूर

सरकारी कर्मचारी असूनही तुम्ही जर घरात असलेल्या आई-वडिलांची जबाबदारी नाकारली तर तुमचा पगार १५ टक्के कापला जाणार आहे. आसाम विधानसभेने या संदर्भातल्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. मुलाच्या खात्यातून कापलेला पगार हा आई-वडिलांच्या खात्यात जमा होणार आहे. ‘प्रणाम’ (पॅरेन्ट रिस्पॉन्सबिलिटी अँड नॉर्म्स फॉर अकाऊंटबिलिटी अँड मॉनिटरींग) असे या विधेयकाचे नाव आहे.

सरकारी नोकरीत असलेल्या मुलाने आई-वडिलांची जबाबदारी नाकारून त्यांना वृद्धाश्रमात धाडले तर त्याविरोधात आई-वडिलांना सरकारी समितीकडे तक्रार करता येईल. त्यानंतर ९० दिवसात आई-वडिलांची जबाबदारी नाकारणाऱ्या मुलावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन आसाम सरकारतर्फे देण्यात आले आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये वयोवृद्ध आई-वडिलांची काळजी न घेणे हा एक गुन्हा आहे. आता आसामने आणलेल्या कायद्यामुळे आई-वडिलांना त्यांची इच्छा नसताना वृद्धाश्रमात धाडणाऱ्या मुलांविरोधात कठोर कारवाई होणार आहे.