‘एक होती राजकन्या’मध्ये आता आस्ताद काळेची एन्ट्री

35

सामना ऑनलाईन । मुंबई

सोनी मराठीवरील ‘एक होती राजकन्या’ मधील ‘अवनी’चा प्रवास दिवसेंदिवस रंगतदार होत चालला आहे. त्यामध्येच एका ‘खास’ नवीन पात्राने मालिकेत एंट्री केली आहे. पत्रकार असलेल्या या नव्या पात्राचे नाव आहे ‘पुष्कराज’. अभिनेते आस्ताद काळे ही भूमिका निभावताना दिसतील. पुष्कराजची ‘हटके’ एंट्री आणि अवनीशी झालेल्या भेटीमुळे प्रेक्षकांची उत्सुकता निश्चितच ताणली गेली आहे.

‘एक होती राजकन्या’ मध्ये आतापर्यंत झालेल्या एपिसोड्स मधून अवनीचा स्वभाव, तिच्या घरचे वातावरण, तिचे पोलीस खात्यात वावरणे इ. प्रेक्षकांच्या चांगलेच ओळखीचे झाले आहे. अवनीच्या या छोट्याश्या जगात आता एका नवीन पात्राची भर पडली आहे. मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आस्ताद काळे साकारत असलेल्या पुष्कराजची एंट्री म्हणजे प्रेक्षकांसाठी सुखद धक्काच आहे. पुष्कराज पोलीस ठाण्यात बातमी शूट करत असताना अवनी अनवधानाने त्याच्या वाटेत येते. अवनी आणि पुष्कराजची ही प्रोमोत दिसलेली ओझरती भेट बरंच काही सांगून जाते. पुष्कराज पोलीसांशी बोलत असताना अवनीच्या वडिलांचा संदर्भ आलेला प्रोमोत दिसतो. त्यामुळे तो आणि अवनी त्यांची भेट व्हायच्या आधीच एका अदृश्य धाग्याने बांधले गेले आहेत असे प्रेक्षकांना वाटत आहे. वरवर पाहता साधी वाटणारी ही अचानक झालेली छोटीशी भेट कोणते वळण घेईल…, का ती एका नव्याच कथानकास सुरुवात करेल.., हे पाहणे मनोरंजक असणार आहे.

पुष्कराज आणि अवनीची भेट अचानक झाली असली तरी अवनीला पुष्कराजबद्दल आधीपासूनच आदरयुक्त कुतुहूल आहे. पण पुष्कराज नक्की कोण आहे, त्याचा भूतकाळ काय आहे आणि त्याच्या अचानक येण्याचा हेतू काय असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. मालिकेचे पदर जसे उलगडत जातील तसा पुष्कराज प्रेक्षकांना कळू लागेल. अवनी आणि पुष्कराज मध्ये कशा प्रकारचा संवाद होतो, त्यांच्यात कसे नाते निर्माण होते यावर प्रेक्षकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे अवलंबून आहेत. कदाचित पुष्कराजचा मालिकेतील प्रवेश मालिकेला एकदम कलाटणी देखील देऊ शकेल.

आपली प्रतिक्रिया द्या