अटल’रत्न’ निखळले, हिंदुस्थान शोक सागरात


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हार नहीं मानूँगा,
रार नहीं ठानूँगा,
काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ।
गीत नया गाता हूँ।

या आपल्या कवितेसारखं निडर जीवन जगणारे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आज राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते 93 वर्षांचे होते. हिंदुस्थानच्या 72 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्याच दिवशी अटलजींच्या निधनामुळे सारा देश शोक सागरात बुडाला आहे.

अटल बिहारी वाजपेयी वाजपेयी यांना युरिन इन्फेक्शनमुळे 11 जूनला ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते 2009 सालापासून म्हणजे गेली नऊ वर्षे आजारीच होते. पक्षाघातामुळे वाजपेयींना कोणाशीही बोलता येत नसून स्मृतिभ्रंशामुळे त्यांना लोकांना ओळखणेही कठीण झालेले होते. गेल्या 9 आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांच्याकडून उपचाराला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. बुधवारी रात्री त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं. अखेर गुरुवारी 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 ला मध्यप्रदेशमधील ग्वालियर येथील शिक्षकी पेक्षा असलेल्या कुटुंबामध्ये झाला. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया कॉलेजमधून राज्यशास्त्रात मास्टर्स पदवी संपादन केली. यासह ते एक उत्तम कवी, प्रखर वक्ते होते. सुरुवातीला काही काळ त्यांनी पत्रकारिताही केली. 1942 मध्ये भारत छोडो चळवळीच्या निमित्ताने त्यांचा राजकारणाशी संबंध आली. तेव्हा त्यांना अटकही झाली होती. याच दरम्यान श्यामा प्रसाद मुखर्जी व पर्यायाने भारतीय जनसंघ यांच्या संपर्कात आले. भारतीय जनसंघाचे नेते म्हणूनच त्यांची कारकीर्द सुरू झाली. राजकीय कारकीर्द सुरू झाल्यानंतर 1957 ला बलारामपूरमधून ते पहिल्यांदा खासदार झाले.

तीन वेळा घेतली पंतप्रधानपदाची शपथ

अटल बिहारी वाजपेयी यांनी तीन वेळा हिंदुस्थानचे पंतप्रधानपद भूषवले. 1996 च्या निवडणुकीत भाजप 162 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. अनेक प्रादेशिक पक्ष तसेच छोट्या पक्षामुळे 1996 ची लोकसभा त्रिशंकु राहिली. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण मिळाले. वाजपेयी यानी पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली. पण लोकसभेत विश्वासमत प्रस्ताव चर्चेवेळी इतर पक्षांकडून पाठिंबा मिळवणे भाजपाला शक्य झाले नाही. त्यामुळे बहुमत चाचणी न घेताच वाजपेयींनी 13 दिवसात राजीनामा दिला आणि वाजपेयी सरकार कोसळले.

1998 च्या निवडणुकांत भाजप पुन्हा प्रबळ दावेदार झाला आणि वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यावेळी भाजपाने इतर पक्षांसोबत मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रा.लो.आ.) ( NDA – National Democratic Alliance), ची स्थापना केली. अखेर 1998 च्या अखेरीस अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी रालोआचा पाठिंबा काढला. यावेळी विश्वासमत प्रस्तावावेळी वाजपेयी सरकार अवघ्या एका मताने पडले. विरोधी पक्षसुद्धा सरकार स्थापन करू शकला नाही व अखेर हिंदुस्थान पुन्हा लोकसभा निवडणुकांना सामोरा गेला. त्यावेळी वाजपेयी हे काळजीवाहू पंतप्रधान बनले.

यानंतर 1999 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये (राष्ट्रीय लोकशाही आघाडीला(रालोआला) घवघवीत यश मिळाले आणि वाजपेयींनी सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. वायपेयी 19 मार्च 1998 ते 19 मे 2004 पर्यंत पंतप्रधान होते.

इतर कार्यकाळ
> जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (1968-1973)
> जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (1955-1977)
> जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (1977-1980)
> भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (1980-1986)
> भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (1980-84, 1986, 1993-96),
> विरोधी पक्षाचे नेते (11 वी लोकसभा)
> हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री ( 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979)

महत्त्वाचे पुरस्कार –

  • पद्मविभूषण पुरस्कार – 1992
  • लोकमान्य टिळक पुरस्कार – 1994
  • उत्क्रृष्ट संसदपटूचा पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार – 1994
  • हिंदुस्थानचा सर्वोच्च पुरस्कार, भारतरत्‍न – 2014

वायपेयी पंतप्रधानपदावर असताना घेतलेले मोठे निर्णय

अणुचाचणी –
मे 1998 मध्ये वाजपेयी सरकारने जमिनीखाली 5 अणुचाचण्या केल्या. सत्ता प्राप्त केल्यावर केवळ एका महिन्यात करण्यात आलेल्या या चाचण्या जगाला, खास करून अमेरिकेला हादरवणार्‍या ठरल्या, कारण हिंदुस्थानने अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाला चुकवून त्या पार पाडल्या होत्या.

लाहोर भेट आणि चर्चा –

1998 च्या शेवटी वाजपेयींनी पाकिस्तान सोबत शांतता चर्चेसाठी पुढाकार घेतला. त्यांनी लाहोर-दिल्ली दरम्यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ते स्वतः पहिल्या बसमधून पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी गेले.

कारगील युद्ध –

1999 च्या प्रारंभी पाकिस्तानने आपले सैनिक आणि अधिकारी दहशतवाद्यांच्या वेशात भारतीय रिकाम्या चौक्यांवर घुसवली. उन्हाळा सुरू होताच हिंदुस्थानी सैन्याच्या ध्यानात ही बाब आली. यानंतर जून 1999 मध्ये ‘ऑपरेशन विजय’ सुरू झाले. हिंदुस्थानी सैन्याला अतिदुर्गम प्रदेश, अतिउंच शिखरे, बोचरी थंडी यांचा सामना करावा लागला. हवाई दल आणि भूदलाच्या एकत्रित कारवाईने पाकिस्तानला पराभूत केले.

खेल भी जीतो और दिल भी –

1999 च्या कारगिल युद्धानंतर दोन्ही देशातील क्रीडासंबंधही बिघडले होते. यावेळी युद्धानंतर पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला त्यांनी ‘खेल भी जीतो और दिल भी’ हा संदेश दिला होता.

विमानाचे अपहरण

1999 साली तालिबान अतिरेक्यांनी IC – 814 या प्रवासी विमानाचे अपहरण केले. हे विमान नेपाळची राजधानी काठमांडूकडून दिल्लीला निघाले होते. अतिरेक्यांच्या या कृतीमुळे वाजपेयी सरकारने 3 अतिरेक्यांच्या बदल्यात प्रवासी विमानाची सुटका केली.

संसदेवरचा हल्ला

2001 साली दहशतवादी अफझल गुरू आणि त्याच्या साथीदारांनी संसदेवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 7 सुरक्षा रक्षक मारले गेले. मात्र, दहशतवाद्याचा खात्मा पोलिसांनी केला म्हणून मोठा अनर्थ टळला, कारण एका दहशतवाद्याच्या अंगावर पूर्ण संसद उडवू शकेल एवढं RDX होते.

Summary: Ex Prime Minister of India Atal Bihari Vajpayee Passed Away