जेव्हा परळीच्या सभेत अटलजी मराठीतून बोलले…

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

अटलजींच्या अनेक आठवणी परळीकरांच्या मनात घर करून आहेत. शहरात 1999 सालच्या निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी अटल बिहारी वाजपेयी परळीत आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. अटलजी विविध भाषेत पारंगत होते हे सभेत जमलेला जनसमुदाय जाणून होता परळी येथे वैद्यनाथ महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात ऐकण्यासाठी मोठी गर्दी जमलेली होती काहींना जागा न भेटल्याने वैद्यनाथ कॉलेज मागे असलेल्या डोंगरावर लोक बसले होते.

अटलजींचे भाषण सुरू झाले तेव्हा ते कोणत्या भाषेत बोलतात याकडे सर्वांचे लक्ष होते. माईकसमोर येताच अटलजी मराठीत म्हणाले ”त्या तिकडे डोंगरावर माझे भाषण ऐकण्या करता लोक बसलेले आहेत” हे वाक्य बोलताच प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला वैजनाथ कॉलेज समोरील डोंगरावर काही लोक बसलेले होते त्यांना उद्देशून वाजपेयी मराठी बोलले, त्यांनी आपले संपूर्ण भाषण हिंदीतच केले मात्र भाषणाची सुरुवात मराठी वाक्याने केल्याने समोरील जनसमुदाय रोमांचित झाला होता हे वाक्य मराठीतून बोलण्याने आजही ती आठवण परळीकरांच्या मनात घर करून आहे.