जनसंघाच्या अधिवेशनाला अटलजींची हजेरी

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर 

संभाजीनगर शहरातील माणिकचंद पहाडे महाविद्यालयाच्या मैदानावर १९६७ साली भरविण्यात आलेल्या जनसंघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे उपस्थित होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी अलोट जनसमुदाय उसळला होता, अशी आठवण जनसंघाचे ज्येष्ठ पदाधिकारी रामभाऊ गावंडे यांनी सांगितली.

हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात काँग्रेसची सत्ता आली. त्यावेळी विरोधी पक्ष म्हणून जनसंघ होता. जनसंघाची बांधणी गाव पातळीपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्ते दिवस रात्र एक करीत होते. त्यावेळी वाहतुकीची कोणतेही साधने नसतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अटलबिहारी वाजपेयी आणि दीनदयाळ उपाध्याय यांना राज्यस्तरीय जनसंघाच्या अधिवेशनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. १९६७ साली शहरातील माणिकचंद पहाडे महाविद्यालयाच्या मैदानावर जनसंघाचे अधिवेशन भरविण्यात आले होते. मैदान गर्दीने फुलून गेले होते. अटलजींचे भाषण ऐकण्यासाठी सर्वजण आतूर झाले होते. अटलजी भाषणाला उभे राहिले, भाषण सुरू केले. परंतु त्याचवेळी त्यांना अध्यक्षांचे भाषण झालेले नसताना आपण उभे राहिलो, याची आठवण झाली. त्यांनी सुरू असलेले भाषण थांबवले व दीनदयाळ उपाध्याय यांना भाषण करण्याची विनंती केली. परंतु दीनदयाळ उपाध्याय यांनी अटलजींना संधी दिली. त्यांनतर अटलजींनी एक तास भाषण केले. जनसंघ स्थापन करण्यामागची भूमिका विशद केली. जनसंघाची चळवळ गावागावांपर्यंत पोहचविण्याचे कार्य आपल्या सर्वांना करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे भाषण ऐकून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला, अशी आठवण जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी आमदार रामभाऊ गावंडे यांनी सांगितली.

शेकट्याच्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी
१९७२ साली विधानसभेच्या निवडणुका लागल्या. या निवडणुकीच्या प्रचारासाठी अटलबिहारी वाजपेयी आले होते. भोकरदनची सभा आटोपून फुलंब्रीला सभा घेण्याचे ठरविण्यात आले. अटलजींना आणण्यासाठी भोकरदनला गेलो. फुलंब्रीला मंगळवार बाजारचा दिवस असल्यामुळे सभेला गर्दी होईल, अशी अपेक्षा होती. परंतु सभेला म्हणावी तशी गर्दी जमली नाही. सभेला गर्दी झाली नसल्याचे कळाल्यामुळे अटलजींना फुलंब्रीला न थांबवता सरळ संभाजीनगरला घेऊन आलो. त्यामुळे अटलजी नाराज झाले. संभाजीनगरात जेवण केल्यानंतर शेकटा येथे सभेला घेऊन गेलो. शेकटा येथील अटलजींच्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. सभा संपल्यानंतर अटलजींनी पाठीवर शाब्बासकीची थाप दिली व सभेची गर्दी पाहून ते खुश झाले. त्यांच्या सभेला स्वखर्चाने लोक आले होते. अटलजींचे भाषण हे स्फुर्ती देणारे होते, अशी आठवण रामभाऊ गावंडे यांनी सांगितली. अटलजींसोबतच्या आठवणी सांगताना गावंडे अत्यंत भावुक झाले. त्यांच्या तोडातून शब्दही फुटत नव्हते.