मूर्तिमंत भीती!

डॉ. विजय ढवळे, ओटावा-कॅनडा

गोविंद बल्लाळ देवल यांचे ‘शारदा’ हे प्रसिद्ध नाटक, बालविवाहाच्या भीषण वास्तवावर आधारलेले होते. त्यात नियोजित वयोवृद्ध नवरदेव, कोदंडरावांना पाहून ‘मूर्तिमंत भीती ही मजसमोर राहिली’असे शारदा म्हणते. त्यामध्ये भीतीचे काय भविष्यात स्वरूप असू शकते हे वर्णन केले आहे. पाश्चात्य देशांमध्ये प्रत्येक गोष्टीचा शास्त्रीय आधारावर मागोवा घेण्याचा प्रयत्न असतो. अटलांटा हे जॉर्जिया राज्यातले महत्त्वाचे राजधानीचे शहर. ‘ऑसिटोफेनोन’ या केमिकलचा वास साधारण बदामासारखा असतो. म्हणजे त्यामुळे घृणा वाटावी असे तर नक्की नाही. पण इयरी युनिव्हर्सिटीच्या एका रसायनशाळेत शास्त्रज्ञ त्या केमिकलची बाटली उघडताच त्यांना प्रयोगशाळेतल्या उंदरांना विजेचा झटका बसल्यासारखे दुःख झाले आणि तसे दोन तीनदा झाल्यावर उंदरांना ज्ञात झाले की या वासामध्येच काहीतरी वाईट पुढे घडेल असा सिग्नल आपणाकरता दडलेला आहे! त्यानंतर त्या उंदरांच्या दोन पिलांचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यात आले. या तिसऱ्या पिढीतही केमिकलविषयीची भीती ही दडून बसली होती, जरी त्या पिढीने केमिकलच्या वासाचा प्रत्यक्ष असा कधी अनुभवही घेतला नव्हता. त्यातून प्रश्न उपस्थित झाला की भीतीची भावना ही पिढ्यानपिढ्या पुढे दिली जात असते काय?

ब्रायन डायस हा ‘मानवी सुप्त मन’ या विषयातला व्यासंगी माणूस. हिंदुस्थानात जन्मला. त्याने दलाई लामांचीही भेट घेतली आहे. तिबेटच्या तत्त्वज्ञानाचीही त्याला भरपूर माहिती आहे. त्याने ज्या शाखेचा सखोल अभ्यास करण्याचे ठरवले त्याला Epigenetics (Beyond Genetics) ही संज्ञा आहे. युद्ध पेटण्याची किंवा पूर येण्याची भीती ही पुढच्या पिढीतही उतरते का? थोडक्यात, आपल्या जिन्स, गेल्या पिढीत आलेले अनुभव कितपत आठवू शकतात? प्रत्येकामध्ये असलेल्या जिन्सपैकी अर्ध्या आईकडून आणि उरलेल्या अर्ध्या वडिलांकडून आलेल्या असतात हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामध्ये आयुष्यभर बदल हे होतच असतात. तेही अटळ आहे. प्रत्येकाच्या शरीरात सुमारे २० हजार जिन्स असतात. अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत त्यांच्यामध्ये झपाट्याने बदल होतो. मिसाईल ग्रुप हा हायड्रोजन आणि कार्बन याच्या कणांपासून बनलेला अॅटम असतो. तो डीएनएमधील क्रोमोझोम्सना जाऊन चिकटतो. त्यामध्ये ‘उपर-निचे’ घडवून आणतो. म्हणजे नेमके काय हेच एपिजेनॅटिक्स या शास्त्राच्या शाखेला जाणून घ्यायचे आहे! त्याचमुळे पुढच्या दोन पिढ्यांत आपण कोणकोणत्या भावना, अनुभव पास ऑन करतो हे संशोधकांना पडलेले कोडे आहे.

नेथन केळरमन हा ज्यू वंशीय मानसोपचारतज्ञ. त्याने अनेक प्रयोगांती निष्कर्ष काढला की दुसऱ्या महायुद्धात क्रूरकर्मा हिटलरने ६० लाख ज्यूंची जी ससेहोलपट केली, त्यांचे हालचाल करून त्यांना छळछावण्यांत कोंडून, अक्षरशः जिवंतपणी सोलून काढले ती भीती त्या दुर्दैवी लोकांच्या पुढच्या पिढय़ांमध्येही त्यांच्या जिन्समधून ट्रान्स्फर झालेली आहे. त्याने हा निष्कर्ष २०१३ साली प्रसिद्ध केला आणि त्याला पुष्टी मिळाली ती आणखी तीन वर्षांनी. न्यूयॉर्कच्या मेयो हॉस्पिटलने जाहीर केले की, हार्मोन्सच्या माध्यमातून भीती, ताण सहन करण्याची शक्ती यावर पुढच्या पिढ्यांमध्ये पण परिणाम होतोय. उदाहरणार्थ ज्यूंचे निर्घृण शिरकाण. ज्याला होलोकॉस्ट म्हणतात. त्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या पुढच्या पिढीमध्ये क्रोमोसोमवर एक प्रकारचा बारीकसा केमिकल पापुद्रा आढळला! त्यामुळे आपल्या आईवडिलांच्या वाट्याला जे क्रौर्य आले त्या विखारी आठवणींची साठवण झालेली होती. परंतु या सर्वांचा अर्थ भीतीची भावना पुढच्या पिढीतही पसरवण्याचा नसेलही, उलट त्या पिढीला अशा अमानवी क्रूरतेला तोंड देण्यासाठी मानसिक धैर्य येण्याचाही असू शकतो. हा केलरमनचा सिद्धांत आहे. भयानक पुरामधून वाचलेल्यांची पिढी त्यांच्या मुलांना व नातवंडांना असे संकट येऊ शकते, त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी सक्षम राहा असाही संदेश देण्याचा प्रयत्न करीत असावी.

मागच्या पिढीने सोसलेल्या सर्व दुर्दैवाचे भीती, तणावामध्ये रूपांतर होते का? नाही. पुढची पिढी जर सुखवस्तू आयुष्य जगत असेल तर एक तापदायक स्थिती त्यापलीकडे तिच्यावर परिणाम होत नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांपुढे आव्हान आहे की नकोशा आठवणी आपण पुसून काढू शकतो का, किमान त्यांचा परिणाम तरी सह्य करू शकतो का? त्याला डीएनए क्लिनिंग (शुद्धिकरण) या नावाने संबोधले जाते. ज्यू लोकांना अत्यंत भयानक परिस्थितीचे बळी व्हावे लागले होते. पण त्याचा परिणाम ज्यांनी तो छळ भोगला त्यांच्याच मुलाबाळांमध्ये डीएनएच्या रूपात आला की भोवतालच्या ज्यू लोकांना, ज्यांचा होलोकॉस्टमध्ये बळी गेला नाही. त्यांच्याही पुढील दोन पिढ्यात दिसू लागला. या प्रयोगातून जर होकारार्थी उत्तरे मिळाली तर ज्यू समाज कसा एकसंध, एकविचारी आहे, आपणापैकी एकाला खुपत असलेली जखम ही इतर समाजघटकांनाही जाणवते हे सिद्ध होईल हा डॉ. डायसचा दावा आहे.

स्पेनमध्ये शास्त्रज्ञांनी एक ट्रान्सजीन एका किड्यामध्ये घातली. तिचे वैशिष्ट्य म्हणजे थंड वातावरणात चमकते आणि तिचा प्रकाश भोवतालचे तापमान वाढवले तर जास्त प्रखर होतो. या किडय़ांच्या पुढच्या सात पिढ्यांमध्ये हा गुणधर्म राखून ठेवला असे आढळून आल्याने संशोधक स्तंभित झाले! ड्यूक युनिव्हर्सिटीमध्ये त्याच प्रकारच्या किड्यांमधील मातांमध्ये ही ट्रान्सजीन टोचली आणि त्यांना रोज देणारे अन्न कमी केले. म्हणजेच त्यांना भुके ठेवून शेवटी उपाशीपोटी मारले. या मातांच्या पुढच्या पिढ्या अन्न कमी दिले तरी जगू शकत होत्या. याचाच अर्थ संकटाशी मुकाबला करण्याची ताकद त्यांच्या आईने आपल्या जिन्समधून पुढच्या पिढीत ट्रान्स्फर केली होती. स्वीडनच्या उत्तर भागात नेहमी पूर येतात. तिथे राहणाऱया स्त्र्ायांना हृदयविकाराचा त्रास होण्याची दाट शक्यता असतेच पण त्यांची मुले जरी तो भाग सोडून जगात इतरत्र राहायला गेली, तरी त्यांच्या मनात पुराची भीती ही मानसिक पातळीवर निश्चित जागरूक असते हेदेखील सिद्ध झाले. स्वीडनमध्येच चहापान करणाऱ्या स्त्रियांत एपिजेनेटिक इफेक्टस् आढळून आले. नवलाची गोष्ट ही की कॉफी पिणाऱ्या पुरुषांत कोणताही दुष्परिणाम जाणवला नाही.

एपिजेनेटिक्सचा अभ्यास हा केवळ भावनिक नाही. त्याचा गुन्हेगारी प्रवृत्ती माणसात का येते, कुठून येते व कशी बळावते हे शोधून काढण्याकरिताही महत्त्वाचा आहे. मग परिस्थितीमुळे माणूस गुन्हेगार बनतो हे सिनेसृष्टीमुळे जगभर पसरलेल्या सिद्धांताची कशी संगती लावायची? यावर डॉ. जे. सी. बार्नस आणि डॉ. ब्रायन बॉटवेल हे गेले दशकभर संशोधन करीत आहेत. त्यांच्यात देखील मूलभूत मतभेद आहेत. एक मानतो की माणूस हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असतो तो त्याच्या डीएनएमध्ये असलेल्या क्रोमोझोम्समुळेच तर दुसऱ्याचे म्हणणे की तो ज्या परिस्थितीत राहतो, वाढतो, त्याला जे बरे-वाईट अनुभव येतात त्यावरून तो किती हिंस्र प्रवृत्तीचा होणार आहे हे ठरते! म्हणूनच खुनाची वा पाशवी बलात्काराची केस लढवताना वकील नेहमी आरोपीच्या बालपणामधील हाल आणि अपेष्टांचे भांडवल करीत असतात. ते हे सिद्ध करू पाहतात की हा आरोपी मुळात वाईट नव्हताच. परंतु त्याच्या भोवतीच्या वातावरणामुळे गुन्हेगार झाला. तसे असेल तर मग दिल्लीत गाजलेल्या निर्भया केसचे काय? ती बिचारी, दुर्दैवी तरुणी बॉयफ्रेंडसह बसमध्ये चढली. तिच्यावर ड्रायव्हरसकट सातजणांनी पाशवी अत्याचार केला. तिचा खून केला. यात परिस्थितीला कसे जबाबदार धरता येईल?

या नवीन एपिजेनेटिक्स शास्त्राच्या मर्यादा अशा आहेत की तुम्ही उंदरावर प्रयोग करून एक सिद्धांत समोर मांडता पण उंदराची वीण ही झपाट्याने पैदास करणारी आहे. त्यांच्यावर सिद्ध झालेले निष्कर्षही मानवी जीवनाला लागू पडतील काय? कारण मानवी प्राण्यांवर अशा प्रकारचे प्रयोग करणे कायद्याला मान्य नाही. रिचर्ड ट्रांबले हा कॅनेडियन डॉक्टर मॉन्ट्रियल युनिव्हर्सिटीत आणि आयर्लंडमध्ये डब्लिन युनिव्हर्सिटीत प्राध्यापक आहे. त्याने एपिजेनेटिक्स आणि मुलांमधील खुनशी वृत्ती यांच्यात काही सांधा आहे का यावर संशोधन चालू केले. त्याचे प्रयोग हे मुख्यतः जुळ्या मुलांशी निगडित आहेत. कॅनडात गुरुकुल पद्धतीत अनेक मुलांवर पद्धतशीर लैंगिक अत्याचार झाले. त्याबाबत संबंधित शिक्षकांना तुरुंगवासही भोगावा लागला. त्या पीडित मुलांच्या पुढच्या पिढीत आपणावरही बळजबरी होईल काय ही भीती दडून बसली आहे का हे डॉ. ट्रांबलेला एपिजेनेटिक्सद्वारा शोधून काढायचे आहे.

जग बदलायचे असेल तर मागच्या पिढीची दुःखे, भीती यांना पुढच्या पिढीत येण्यापासून थोपवले गेले पाहिजे. त्याकरिता कॅनडा व डब्लिन येथील काही कुटुंबे या प्रयोगांमध्ये स्वखुशीने सामील झाली आहेत ही आशादायक गोष्ट आहे. त्यामुळे निदान कारणमीमांसा तरी समजू शकेल. हिंदुस्थानात तर फाळणीनंतर जो अभूतपूर्व नरसंहार झाला, लाखो निरपराध लोकांना जीव गमवावे लागले, त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये ही भीतीची भावना आली आहे काय, हा संशोधनाचा चांगला विषय ठरू शकतो. फार काय, जातीय दंगली, नोव्हेंबर २६ रोजी कसाब व त्याचे साथीदार यांनी १६५ लोकांची मुंबईमध्ये केलेली हत्या- त्यामध्ये बळी पडलेल्यांच्या दुसऱ्या पिढीच्या डीएनएचे पृथःकरण करणेही खूप शिकवून जाईल, पण लक्षात कोण घेतो?
(लेखक कॅनडास्थित उद्योजक आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या