नवीन वर्षात थोडा दिलासा, ATMमधून ४५०० रुपये काढा

सामना ऑनलाईन । मुंबई

लाईक करा, ट्विट करा

नोटाबंदीनंतर गेले ५० दिवस दैनंदिन उपयोगासाठी सुटे पैसे मिळवताना हिंदुस्थानातील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला. मात्र आता नवीन वर्षात हा त्रास थोडा कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एटीएममधून २५०० रुपयांची मर्यादा वाढवून ४५०० इतकी केली आहे. त्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळणार आहे.

हिंदुस्थानात नोटाबंदी करून कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले. मात्र त्यामुळे अचानक कॅशलेश झालेल्या नागरिकांना बँका आणि एटीएम बाहेर रांगा लावाव्या लागल्याचे चित्र होते. एटीएममधून पहिले काही आठवडे फक्त २००० रुपये काढता येत होते. गेल्या आठवड्यात ही रक्कम ५०० रुपये वाढवून २५०० रुपये इतकी केली होती. त्यामुळे लोकांना दरदिवशी एटीएमच्या बाहेर रांगा लावाव्या लागत होत्या. मात्र रिझर्व्ह बँकेले मर्यादा थोडी सैल केल्याने काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

…पण सुट्या पैशाचा प्रश्न कायम

आरबीआयने एटीएममधून ४५०० रुपये काढता येणार असल्याचे सांगितले असले तरी अनेक बँकाचे एटीएम केंद्र अद्याप बंद आहेत. एटीएममधून तसेच ५०० रुपयांपेक्षा २००० रुपयांच्या नोटा अधिक प्रमाणावर येत असल्याने नागरिकांचे सुटे मिळवताना हाल होतात. त्यामुळे ४५०० रुपये काढताना २०००च्या दोन नोटा आल्यास मोठी अडचण होईल, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.