आत्माराम हातमोडे

3

>>संजय कदम<<

पारंपरिक शेतीला तांत्रिक शेतीची जोड देऊन त्यातून भरघोस पिके घेण्याचा व येणारे पीक देशासह परदेशात पाठविण्याचा प्रयत्न पनवेल तालुक्यातील गिरवले या छोटय़ाशा गावात राहणारे आत्माराम हातमोडे हे गेल्या अनेक वर्षांपासून करीत असून आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. आत्माराम हातमोडे त्यांनी आपल्या मेहनतीला तांत्रिक ज्ञानाची आणि खरिपातील भातपिकाला उन्हाळी भाजीपाला पिकांची जोड देऊन शेतीतून आपली आर्थिक भरभराट करण्याची किमया साधली. सात एकर शेतीमध्ये केवळ खरिपातले भातपीकच मिळवणारे हातमोडे पारंपरिक शेतीला छेद देऊन हिवाळ्यात नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये भाजीपाला लागवडीचा सकारात्मक विचार करतात आणि तो प्रत्यक्षात उतरवितात. तेव्हा त्यांची शेती काही देऊ शकते हा आत्मविश्वास अधिक दृढ होतो. पावसाळा संपला की नोव्हेंबरमध्ये रोपवाटिका करून कारल्याचे पीक ते घेतात. त्यांनी कारल्याच्या शेतीबाबत माहिती देताना सांगितले की, रोपे तयार करण्यासाठी कोकोपीटचा वापर केला जातो. प्लॅस्टिकच्या ट्रेमध्ये बियाणे लावून वाढवलेली रोपे शेतात लावली जातात. या पद्धतीमुळे रोपांची वाढ लवकर आणि व्यवस्थित होते तसेच रोप वाया जाण्याचा धोका कमी होतो. वेलवाढीसाठी शेतात ७-७ फूट अशा अंतराने बांबू बांधले जातात. हे बांबू तारेने बांधले जातात. तसेच बांबूच्या डोक्यावर ९-९ इंच या आकाराची नायलॉनची जाळी बसवली जाते. त्यामुळे वेल पसरण्यास मदत होते आणि वेलींनाही आधार मिळतो. कारले डिसेंबरपासून मेपर्यंत म्हणजेच पावसाळा सुरू होईपर्यंत भरघोस पिके वाढतात.

या पिकांसाठी खत व पाणी व्यवस्थापन करताना लागवडी आधी एकरी दहा ट्रॉली शेणखत तर काही प्रमाणात गांडूळ खताचा वापर केला जातो. लागवडीनंतर आठ दिवसांनी डामिथोएट या कीटकनाशकाची फवारणी केली जाते. त्यानंतर १५ दिवसांनी वेगवेगळ्या कीटकनाशकांचा वापर केला जातो. १९-१९-१९, ०-५२-३४, ०-०-५०, अशा विद्राव्य खतांचा वापर गरजेनुसार केला जातो. ठिबक सिंचनाने पिकाला पुरेसे पाणी दिले जाते. हातमोडे सांगतात की, पावसाळ्यातले भातपीक घेऊन आपला शेतकरी गप्प बसतो. पण आजच्या शेतमजुरांचा खर्च पाहता निश्चितच भातशेतीत केवळ मेहनतच अधिक आहे. अशा वेळी भातशेतीनंतर जर शेतकऱ्याने डिसेंबरमध्ये भाजीपाला पिकविण्यावर भर दिला तर अधिक फायदा निश्चित होईल. कारले पीक हे फायदेशीर आहे. पिकांचा तोडणी हंगाम चार महिने चालतो व किलोला २० ते २५ असा चांगला दर मिळतो. उत्पादन १० ते १५ टन मिळाले तरी खर्च वजा जाता हाती समाधानकारक उत्पन्न मिळते. सध्या चालू वर्षात त्यांनी २ टन वाडा कोलम, जय श्रीराम चंद्रपूरच्या भाताचे पीक काढले. त्याचप्रमाणे सुवासिक भात म्हणून इंद्रायणी हे पीक काढले आहे. वडिलोपार्जित शेतीमध्ये आधुनिक पद्धतीची शेती करण्यासाठी ते दररोज वृत्तपत्र वाचन करतात. त्याचप्रमाणे टीव्हीवर शेतीविषयक असणारे विविध कार्यक्रम पाहून त्याद्वारे ते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तेथील शेतीपद्धतीचा अभ्यास करतात व तो केलेला अभ्यास आपल्या शेतीत पिकाच्या रूपाने उगविण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते पुस्तकाचे वाचनसुद्धा करतात. ठिबक सिंचन पद्धतीने ते भाजीपाला घेतात. त्यांनी उत्पादन केलेल्या कारल्याला परदेशातसुद्धा चांगली मागणी आहे. त्याचप्रमाणे झेंडूची फुले, वांगी, कांदा, कोबी, फ्लॉवर, उन्हाळ्यात कडधान्य म्हणून हरभरा, वाल (पावटा), चवळी, मूग ही पिके घेतात. गेल्या महिन्यात पाऊस नसल्याने त्यांनी आपल्या शेतामध्ये भाडय़ाने पाण्याचे टँकर आणून भातशेती जगवली होती. त्यांच्या या सधन कार्याची दखल रोटरी क्लबतर्फे घेण्यात आली असून त्यांना व्यवसाय सेवा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रायगड प्रेस क्लबतर्फे त्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे त्यांना रायगड गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शेती हा माझा प्रथम आत्मा असून त्यानंतर समाजकारण व राजकारण हे त्यांचे ब्रीद आहे. गेले २० वर्षे ते ग्रामपंचायतीचे सदस्य होते तसेच दोन वेळा त्यांनी सरपंचपदही भूषविले आहे. या व्यवसायात त्यांना आता दोन्ही मुलांची साथ मिळत असून तेसुद्धा आधुनिक शेतीकडे वळले आहेत.