पोकलँड चालकास बेदम मारहाण, सरपंचासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

75

सामना प्रतिनिधी । परभणी

जिंतूर तालुक्यातील बोरीनजीक कान्हड येथे गायरान जमीनीवर जलयुक्त शिवारअंतर्गत नाली खोलीकरणाच्या काम करणाऱ्या पोकलँड चालकास गावातील सरपंच व अन्य पाच जणांनी बेदम मारहाण करत काम बंद पाडले. पोकलॅडचालक विजय लक्ष्मण सूर्यवंशी यास परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या पुढे गावात कोणतेही विकास काम करायचे असेल तर ठरलेली टक्केवारी (पैसे) द्यावेच लागतील, अन्यथा पोकलँड मशीन जाळून टाकू, अशी धमकीही सरपंच व अन्य आरोपींनी दिली आहे. विशेष म्हणजे त्याच गावातील कृषी सहाय्यक समक्ष हा मारहाणीचा प्रकार घडला असून या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात सरपंचासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोरी नजीकच्या कान्हड येथे गायरान जमीनीवर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयामार्फत दीड लाखाच्या नाली खोलीकरणाचे काम मंजुर करण्यात आले होते. सेलू येथील सवेरा मजुरी सह. संस्थेला हे काम सुटले होते. त्यानुसार मजूर संस्थेचे चेअरमन अब्दुल अजीज अ. शकुर यांनी पोकलँन मशीनद्वारे कृषी सहाय्यक मधुकर रामराव डोंबे यांच्या समक्ष काम सुरु केले. काम सुरु झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोकलॅडचालक तथा फिर्यादी विजय लक्ष्मण सूर्यवंशी यांना तातडीने काम बंद करण्याची मागणी गावचे सरपंच मुंजाभाऊ शंकरराव डोंबे, पं.स. सदस्य सचिन ज्ञानोबा डोंबे यांनी केली. त्यांच्या समवेत अन्य 4 लोक होते. विजय सूर्यवंशी यांनी काम चालू द्या, असे सांगताच सरपंच व अन्य लोक भयंकर चिडले. त्यांनी पोकलॅड मशिनमधून सूर्यवंशी यांना बाहेर काढून लाथा, बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पुन्हा येथे काम केलास तर मशीन जाळून टाकील, अशी धमकीही त्यांनी दिली. सरपंच मुंजाभाऊ शंकरराव डोंबे, सचिन ज्ञानोबा डोंबे व अन्य तीन लोकांनी कृषी सहाय्यक समोर हा मारहाणीचा प्रकार केला. जखमी सूर्यवंशी यांना परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर बोरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन 5 आरोपीविरुद्ध भादवी कलम 324, 323, 143, 147, 427, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु आज तिसऱ्या दिवशीही आरोपीविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या