वल्लभनगर:एसटी चालक मारहाणप्रकरणी एकाला अटक,सेवा पूर्ववत

पिंपरी-चिंचवड – भिवंडी येथे रिक्षा चालकांच्या मारहाणीत एका चालकाच्या मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतानाच आता पिंपरीमध्ये देखील एसटी चालकाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. पिंपरी-चिंचवड येथील वल्लभनगर आगारात एसटी चालक आणि एका कार चालकाच्या वादात कार चालकाने एसटी चालकाच्या कानशिलात वाजविल्याचा प्रकार घडला. ही घटना आज (बुधवारी) सकाळी पावणे सहा ते सहाच्या दरम्यान घडली. दरम्यान, चालकाला मारहाण करणा-या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा संप तीन तासानंतर मागे घेण्यात आला.

प्राथमिक माहितीनुसार, वल्लभनगर आगारात मुक्कामी येणा-या विटा गाडीसाठी एक जागा राखीव आहे. मात्र आज सकाळी याच जागेवर एका खासगी कार चालकाने त्याची चारचाकी गाडी पार्क केली. त्यावरुन एसटी चालक आणि कार चालक यांच्यात वाद झाला. त्यानंतर कार चालकाने एसटीमध्ये जाऊन एसटी चालकाच्या कानशिलात लगावली. घटनेनंतर या आगारातील एसटी काही काळासाठी न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे बाहेरगावी जाणा-या प्रवाशांचे हाल झाले. घटनेनंतर मारहाण करणा-या कार चालकाला संत तुकाराम पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.