सदाभाऊ खोतांवर कीटकनाशक फवारणीचा प्रयत्न, एकजण ताब्यात

सामना ऑनलाईन, यवतमाळ

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर सिकंदर शाह नावाच्या व्यक्तीने कीटकनाशक फवारण्याचा प्रयत्न केला. विषारी कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात १९ शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण विदर्भ हादरला आहे. हे कीटकनाशक फवारल्याने काही शेतकरी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी राज्याचे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यवतमाळमध्ये आले होते, तेव्हा त्यांच्यावर कीटकनाशक फवारणीचा प्रयत्न झाला.

खोत हे बुधवारी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचले. त्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस केली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख मंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेले. ते खोत यांच्याशी चर्चा करत असताना शाह याने कीटकनाशक फवारणीचा प्रयत्न केला. हे कीटकनाशक विषारी होतं का याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.