खंडणीसाठी त्रास, तत्कालीन पोलीस अधिक्षकाभोवती आवळला फास; खंडपीठाने जामीन फेटाळला

12

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

डॉ. उत्तम महाजन यांचे अपहरण करून 25 लाखांच्या खंडणीसाठी त्रास देणाऱ्या तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधिक्षक मनोज प्रभाकर लोहार याचा नियमीत जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी फेटाळून लावला.

डॉ. उत्तम महाजन यांनी 2 जुलै 2009 रोजी तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनोज लोहार व त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने जळगावच्या पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून पोलीस महासंचालकांकडे अहवाल पाठविला होता. मात्र, तक्रार देऊनही गुन्हा दाखल न झाल्यामुळे महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठात फौजदारी याचिका दाखल करून मनोज लोहार व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. खंडपीठाने नोटीस बजावल्यानंतर 16 जुलै 2009 मध्ये तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधिक्षक मनोज लोहर व त्याच्या साथीदारांविरोधात भा.दं.वि. कलम 347, 34-अ, 385 सह 34 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. जळगाव सत्र न्यायालयाने मनोज लोहार आणि धिरज येवले यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या दोघांनी या शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठात स्वतंत्र आपील दाखल केले. दरम्यान तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधिक्षक मनोज लोहार यांनी नियमीत जामीनसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठात धाव घेतली होती. या जामीनवर खंडपीठात सुनावणी झाली असता खंडपीठाने वरील प्रमाणे आदेश दिला. सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. महेंद्र नेरलीकर यांनी बाजू मांडली.

आपली प्रतिक्रिया द्या