हिम्मत होती तर एकेकाने यायचे होते, एमआयएम नगरसेवकाची दर्पोक्ती

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्याच्या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला ‘प्रसाद’ मिळाल्यानंतर देखील त्याचा माज उतरलेला नाही. एआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन याने एक व्हिडीओ जारी केला असून ‘हो, मी केला विरोध’ अशी उद्दाम भाषा तर केलीच पण ‘मी एकटा होतो, हिम्मत होती तर एकेकाने यायचे होते’, असंही म्हणाला.

तो म्हणाला, ‘अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला लोकशाही पद्धतीने आम्ही त्याला विरोध केला. मात्र भाजपच्या नगरसेवकांनी थेट माझ्यावर हल्ला चढवला. दहा-दहा जणांनी हल्ला करून सभागृहाचा अवमान केला, हिम्मत होती तर एकेकाने यायचे होते. मग त्यांना दाखवले असते, हल्लेखोर भाजपच्या नगरसेवकांवर महापौरांनी कारवाई करावी. आम्ही याच्या विरोधात कायदेशीर लढू.’

हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव संभाजीनगर महापालिकेत आणण्यात आला होता. त्याला सय्यद मतीन या नगरसेवकाने विरोध केला. त्यावर शिवसेनेने आवाज उठवला. भाजपच्या नगरसेवकांनी देखील पुढे येत त्याला चोप देण्यास सुरुवात केली आणि मग त्याला सभागृहातून बाहेर काढण्यात आलं होतं. दरम्यान, या घटनेनंतर एमआयएम नगरसेवक समर्थकांचा हैदोस, भाजप संघटनमंत्र्याची गाडी फोडली.