वॉर्नरचा शतकी धमाका! ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर 41 धावांनी दमदार विजय

7

सामना ऑनलाईन । टाँटन

डेव्हिड वॉर्नरने एका वर्षांच्या बंदीनंतर झळकावलेले पहिले शतक… त्याने कर्णधार ऍरोन फिंचसह (82 धावा) केलेली 146 धावांची धडाकेबाज भागीदारी… अन् पॅट कमिन्सच्या प्रभावी माऱयाच्या जोरावर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने बुधवारी पाकिस्तानवर 41 धावांनी दमदार विजय मिळवला आणि वर्ल्ड कपमध्ये तीन विजयांसह सहा गुणांची कमाई केली. 107 धावा तडकावणाऱया डेव्हिड वॉर्नरची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली. पाकिस्तानला चार सामन्यांमधून दुसऱयांदा पराभवाचा सामना करावा लागला.

146 धावांची सणसणीत सलामी
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऍरोन फिंच व डेव्हिड वॉर्नर या सलामी जोडीने पाकिस्तानी गोलंदाजांचे आव्हान लीलया परतवून लावले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 146 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीत दोघांनी नेत्रदीपक फटके मारत स्टेडियममधील क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मोहम्मद आमीरने ऍरोन फिंचला 82 धावांवर बाद करीत जोडी फोडली. त्याने या खेळीत 4 षटकार व 6 चौकारांची बरसात केली. ऍरोन फिंच व डेव्हिड वॉर्नर या जोडीने जबरदस्त सुरुवात केल्यानंतरही कांगारूंना मोठी मजल मारता आली नाही.

पाकिस्तानची झुंज अपयशी
ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या 308 धावांचा पाठलाग करणाऱया पाकिस्तानच्या फलंदाजांनी झुंज दिली, पण कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. इमाम उल हकने 53 धावांची, बाबर आझमने 30 धावांची, मोहम्मद हाफीजने 46 धावांची, सरफराज अहमदने 40 धावांची, हसन अलीने 32 धावांची आणि वाहब रियाजने 45 धावांची खेळी करीत विजयासाठी प्रयत्न केले. पॅट कमिन्सने 33 धावा देत तीन फलंदाजांना बाद केले.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया – ऍरोन फिंच झे. हाफीज गो. आमीर 82, डेव्हिड वॉर्नर झे. इमाम गो. शाहीन 107, शॉन मार्श झे. मलिक गो. आमीर 23, ग्लेन मॅक्सवेल त्रि. गो. शाहीन 20, ऍलेक्स कॅरी पायचीत गो. आमीर 20. अवांतर – 19. एकूण – 49 षटकांत सर्व बाद 307. गोलंदाजी – आमीर 10-2-30-5, शाहीन 10-0-70-2.

पाकिस्तान – इमाम झे. कॅरी गो. कमिन्स 52, हाफीज झे. स्टार्क गो. फिंच 46, रियाज झे. कॅरी गो. स्टार्क 45. अवांतर – 14. एकूण – 45.4 षटकांत सर्व बाद 266. गोलंदाजी – कमिन्स 10-0-33-3, स्टार्क 9-1-43-2.

आपली प्रतिक्रिया द्या