#INDvAUS विराट-बुमराहचे ‘कमबॅक’ निश्चित, रोहितला विश्रांतीची शक्यता

1
virat-bumrah-rohit-sharma

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

न्यूझीलंड दौऱ्यानंतर आता हिंदुस्थानचा संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ हिंदुस्थानविरुद्ध दोन टी-20 आणि पाच एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी येत्या दोन ते तीन दिवसात संघ निवडला जाणार आहे. विराटच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन एक दिवसीय सामन्यात आणि टी-20 मालिकेत नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाचा हिंदुस्थान दौरा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 13 मार्चला मालिकेतील शेवटचा सामना खेळला जाईल. यानंतर 23 मार्चपासून आयपीएल सुरू होणार आहे. त्यानंतर 30 मे ते 14 जुलै दरम्यान इंग्लंड आणि वेल्समध्ये विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेनंतर विश्वचषकासाठी संघ निवडला जाईल.

वरिष्ठ खेळाडूंना मिळणार आराम
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. संघाचे संतुलन राखताना निवड समितीला कसरत करावी लागणार आहे. हिंदुस्थानी संघाने गेल्या वर्षी जास्तीत जास्त वर्षी विदेश दौरे केले. येथे वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.

विराट कोहली, बुमराहचे पुनरागमन होणार
न्यूझीलंडविरुद्ध विश्रांती देण्यात आलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि कर्णधार विराट कोहलीचे कमबॅक होणार हे स्पष्ट आहे. विराट आणि बुमराहच्या आगमनामुळे हिंदुस्थानचा संघ बळकट होणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा हिंदुस्थान दौरा
टी-20 मालिका –
पहिला टी-20 – 24 फेब्रुवारी (विशाखापट्टणम)
दुसरा टी-20 – 27 फेब्रुवारी (बेंगळुरू)

वन डे मालिका
पहिली वन डे – 02 मार्च (हैदराबाद)
दुसरी वन डे – 05 मार्च (नागपूर)
तिसरी वन डे – 08 मार्च (रांची)
चौथी वन डे – 10 मार्च (मोहाली)
पाचवी वन डे – 13 मार्च (दिल्ली)