वेब न्यूज : अॅपलला दणका


>>स्पायडरमॅन

अॅपल कंपनीचा चाहता असलेल्या आणि भविष्यात अॅपल कंपनीमध्ये काम करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या एका किशोरवयीन मुलाने अॅपलच्याच कॉम्प्युटर सिस्टमला भेदून आतमध्ये प्रवेश मिळवला. फक्त एवढय़ावरच तो थांबला नाही, तर त्याने एक 90 जीबीची सुरक्षित फाइलदेखील डाऊनलोड करून घेतली. विशेष म्हणजे हे सगळे त्याने आपल्या मेलबर्नमधल्या घरात बसल्या बसल्या केलेले उद्योग होते. यासंदर्भात अॅपल कंपनीने व्हिक्टोरियाच्या बाल न्यायालयात आपली बाजू मांडली. या मुलाने अगदी सहजपणे अॅपलच्या डेटा प्रोसेसिंग प्रणाली मेन फ्रेममध्ये प्रवेश मिळवला होता. अवघे 16 वर्षे वय असलेल्या या मुलाने संपूर्ण वर्षभरात अनेक वेळा अॅपलच्या सिस्टममध्ये अनधिकृतपणे प्रवेश केला होता. या अनधिकृत घुसखोरीची माहिती मिळताच अॅपलच्या सुरक्षा टीमने तातडीने पावले उचलली आणि पुढे कायदेशीर तक्रारदेखील नोंदवली. पोलिसांनी या मुलाच्या घरावर तातडीने छापा मारला आणि संबंधित डाऊनलोड केलेली फाइलदेखील जप्त केली. मुलाने आपला गुन्हा कबूल केला असून पुढील महिन्यात न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे.