विष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये

सामना ऑनलाईन । सिडनी

शीर्षक वाचून तुम्हालाही किळस वाटली असेल, हे आम्हाला माहीत आहे. खरंतर पैसे कमवण्यासाठी लोक काय वाटेल ते करतात. पण, कोणी विष्ठा विकेल, असं तुम्हाला स्वप्नातही वाटलं नसेल. पण हो, हे खरं आहे. ऑस्ट्रेलियातील काही नागरिक आपली विष्ठा ‘दान’ करून वर्षाकाठी तब्बल ८ लाख रुपये कमवतात.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की ते असं का करतात? तर याचं उत्तर असं आहे की, एका वैद्यकीय प्रयोगांतर्गत या नागरिकांना स्वतःची विष्ठा प्रयोगशाळांना दान करावी लागते. फेकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांट असं या वैद्यकीय प्रयोगाचं नाव आहे. या प्रयोगात विष्ठा देणाऱ्या व्यक्तीच्या विष्ठेत काही औषधं मिसळून ते ‘मिश्रण’ रोग्याच्या शरीरात सोडलं जातं. या प्रयोगामुळे ऑटिझमपासून ते क्रॉनिक डायरियापर्यंतचे अनेक आजार आणि विकार बरे होऊ शकतात, असा हा प्रयोग करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांचा दावा आहे.

पण, स्वतःची विष्ठा देणं हे किळसवाणं असल्यामुळे प्रयोगकर्त्यांना ‘दानशूर’ मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या बदल्यात पैसे देण्याची योजना आखली. ती बऱ्यापैकी यशस्वीही झाली. पण, यातही त्यांच्या काही अटी आहेत. जो माणूस विष्ठा दान करेल, तो सशक्त असणं गरजेचं आहे. त्याचा बॉडी मास इंडेक्स म्हणजे वय-वजन यांचं गुणोत्तर योग्य असणं अनिवार्य आहे. तसंच त्याने ताज्या भाज्या, डाळी, फळे यांचं सेवन करणंही आवश्यक आहे.