गावाकडचे प्रतिभाशाली घर

अरुण म्हात्रे,[email protected]

टेंभुर्णी… पश्चिम महाराष्ट्रातील छोटेसे गाव. आज अनेक लेखक मराठी मातीत पाय रोवू पाहताहेत. महेंद्र कदम हे नाव त्यापैकीच एक…

‘मग माझ्या बंद होण्याच्या साऱया शक्यता वाढीस लागतात. आतल्या आत गुदमरताना रोजचं मरण कांडीत जातात. तशा माझ्या वाटा मलाच नीट दिसेनाशा होत जातात. आतला काळोख हटवावा म्हटलं तरी हटत नाही की, बंद होत जाताना मेंदूला नवी पालवी फुटत नाही.’

ही आहे त्याच्या कादंबरीची सुरुवात. एका दाट मनस्वी जाणिवेची ही गडद वाक्ये वाचल्यावर लक्षात येते की हा अक्षरांची खोगीरभरती करणारा साधा लेखक नव्हे. जीवनाचा सखोल वेध घेणारी ही चिंतनशील लेखणी आहे. मी ते पुस्तक भराभरा वाचत गेलो. आपल्याच गावाकडल्या एका घराची ती ओळखीची कथा होती, पण एका तिरक्या अंदाजात नि वेगळ्याच शैलीत सांगितलेली… त्या लेखकाची सांगण्याची ढब अशी की कोणीतरी आतडं पिळवटून गावाची व्यथा सांगतंय… मला वाचताना जाणवलं की मराठी साहित्यातला गावाकडचा असा प्रतिभाशाली आवाज आहे की आणखी थोडय़ाच दिवसात हे नाव ठळकपणे सर्वांच्या चर्चेत आणि प्रत्येक रसिकाच्या ओठी येणार आहे. मी वाचत होतो त्या कादंबरीचे नाव आहे ‘आगळ’ आणि त्या तीक्ष्ण लेखणीच्या लेखकाचे नाव आहे. महेंद्र कदम.

वयाच्या पंचेचाळीशीतच हा माणूस एका महाविद्यालयाचा प्राचार्य आहे. स्वतः डॉक्टरेट आहे इतकेच नव्हे पी.एच.डी.चा गाईड आहे, मराठीतली बहुचर्चित ७ पुस्तके त्याच्या नावावर आहेत आणि सगळ्यात महत्वाचे विद्यार्थ्यांचे ते अत्यंत लाडके असे शिक्षक आणि टेंभुर्णीच्या विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचे ते विश्वासू आणि आदराचे प्राचार्य आहेत…

टेंभुर्णी या पश्चिम महाराष्ट्रातील काहीशा अपरिचित अशा गावातील हा लेखक मराठी साहित्याची दारे इतक्या जोराने वाजवतो आहे की त्याच्यामुळे टेंभुर्णी हे गाव अचानक साहित्याच्या पटावर आले आहे.

‘आगळ’ कादंबरीला सोलापूरचा भैरुरतन दमाणी पुरस्कारासोबत अजून दोन महत्वाचे पुरस्कार मिळालाय आणि याच कादंबरीवर चक्क एका चित्रपटाची उभारणी सुरू आहे. ‘भूमी’ नावाच्या डॉ. महेंद्र कदम यांच्या घरात (ते एरवी लेखनात वा रोजच्या व्यवहारात आपली डॉक्टर ही उपाधी वापरत नाही) ऐसपैस घरात पुस्तकांचं भारदस्त विश्व उभारलेले महेंद्र कदम हे सतत कुठल्यातरी अभ्यासात वा लेखनात व्यग्र असतात.

खूप कष्टात गेलेलं बालपण. अत्यंत दुर्लक्षित अशा खेडय़ात गेलेले सुरवातीचे दिवस आणि त्याची जाण ठेवून उभा राहिलेला हा लेखक. त्याच्या ‘धूळपावलं’ (कादंबरी) तो भितो त्याची गोष्ट (कथासंग्रह) आणि आता ‘आगळ’ (नवी कादंबरी) या तीनच ललित पुस्तकांनी मुख्य मराठी साहित्य प्रवाहाच्या केंद्रस्थानी आलाय… खरे तर महेंद्र कदम हे मूळचे समीक्षक भाषाविज्ञान, शैलीविज्ञान, अभ्यासाच्या दिशा हे त्यांचे मूळ विषय. या विषयावरची त्यांची पुस्तके विद्यापीठात अभ्यासाला लागलीत. या पुस्तकांना शासनाचे पुरस्कारही मिळालेत… पण आपल्या गावाकडच्या जगण्याची धूळ श्वासाश्वासात मुरवलेले महेंद्र कदम साहित्याच्या ललित विश्वातही दमदार वाटचाल करीत आहेत. अगदी भालचंद्र नेमाडयाना विचाराल तर ते त्यांच्या आवडत्या लेखकांत महेंद्र कदम यांचे नाव आवर्जून घेतील.

पत्नी संगीता ही कदम सरांच्या लेखनाची पहिली साक्षेपी वाचक. टेंभुर्णीसारख्या गावात कदम सरांच्या साहित्यिक वार्तालापात पत्नीपेक्षा भाषेची जाणकार म्हणून भाग घेणारी तर दोन्ही मुले प्रतिक आणि आविष्कार सरांच्या लेखनात रुची असलेले. छोटा आविष्कार हा उत्तम चित्रकार. एकूण साहित्य कला आणि संस्कृती या त्रिविध विषयात मग्न घरातला महेंद्र कदम नावाचा नव्या ताकदीचा लेखक एकीकडे मराठीच्या मोठय़ा पटावर लखलखू लागलाय पण त्याचवेळी तो आपल्या वडशिंगे गावाचा, माढा तालुक्याचा किंवा सोलापूर जिह्यातील ग्रामीण मातीच्या धुळीचा वारा आणि तिथल्या माणसांच्या अंतरंगाचा पारा मनात प्राणपणाने वागवतोय… जणू येणारा काळ या लेखकाच्या लेखणीच्या कर्तृत्वाचा डंका पिटत येणार आहे.

महेंद्र कदम हे नाव आणखी एका वर्षात सर्व मराठी सारस्वतांच्या ओठी असेल… नक्की असेल…!!