मुजोर रिक्षाचालकची प्रवाशाला बेदम मारहाण, घरावरही केली दगडफेक

सामना ऑनलाईन । कल्याण

कल्याणमध्ये रिक्षाचालकांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी  रेल्वे स्थानकासमोर बिशिस्तपणे उभी केलेली रिक्षा हटवताना दोघा मुजोर रिक्षाचालकांनी अश्लील शिवीगाळ करत रेल्वे महिला पोलीस नीलम गुप्ता यांना बेदम मारहाण केली होती. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी पुन्हा कल्याण रेल्वे स्थानक परिसरात जादा भाडे देण्यास नकार देणाऱ्या प्रवाशाला रिक्षाचालकांनी बेदम मारहाण केली आहे.

रिंकू तिवारी असे जखमी प्रवाशाचे नाव असून याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात मुजोर रिक्षाचालक सद्दाम शेख, साकिब खान, मोईन खान, जावेद खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण पूर्वेकडील कचोरे पत्रिपूल परिसरात राहणाऱ्या रिंकू तिवारी आपल्या नातवाईकांसह आठ वाजण्याच्या सुमारास लोकलने कल्याण रेल्वे स्थानकात उतरल्या. यानंतर त्यांनी रिक्षा पकडण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षा स्टॅण्ड गाठले. त्या ठिकाणी असलेल्या सद्दाम नावाच्या रिक्षाचालकाला त्यांनी पत्रिपूलला जाण्यासाठी भाडे विचारले असता त्याने ६० रुपये सांगितले. मात्र रिंकू याने ५० रुपये असताना जादा पैसे का घेता असे विचारले. यावरून या दोघांमध्ये वाद झाला.

या वादातून सद्दाम, साकीब, मोइन, जावेद यांनी रिंकू याना मारहाण केली. त्यानंतर रिंकू यांनी दुसरी रिक्षा करत घर गाठले. मात्र मुजोर रिक्षाचालक इथेच थांबले नाहीत तर त्यांनी या प्रवाशाचा पाठलाग करत त्याचे घर गाठले. त्याच्या घरावर दगडफेक करत त्यांच्यासह कुटुंबीयाना शिवीगाळ करत मारहाण केली. या हल्ल्यात रिंकू जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.