अविनाश बोरकर

>>दुर्गेश आखाडे<<

बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ, मुंबई या संस्थेच्या राज्य नाटय़स्पर्धांमधून पार्श्वसंगीतकार म्हणून एक ओळख निर्माण करत अविनाश बोरकर हे व्यावसायिक रंगभूमीपर्यंत पोहोचले होते. व्यावसायिक रंगभूमीवरही पार्श्वसंगीतकार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. अलीकडेच त्यांचे निधन झाले. खरं म्हणजे अपघातानेच पार्श्वसंगीताची जबाबदारी अंगावर पडलेल्या अविनाश यांचा प्रवास वेगळाच आहे. बेस्टमध्ये नोकरी करत असताना ज्येष्ठ नाटककार कै. प्र. ल. मयेकर यांच्याशी असलेली मैत्री त्यांना हात धरून रंगभूमीवर घेऊन आली. ‘अंदमान’ हे नाटक बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ राज्य नाटय़ स्पर्धेसाठी बसवत होते. या नाटकासाठी खास वेगळ्या संगीताची गरज प्र.ल. मयेकरांना होती. प्र. ल. मयेकरांनी त्याकरिता आवश्यक संगीतव्यवस्था केली होती. फक्त ते संगीत ऑपरेट करण्याची गरज होती. त्यावेळी त्यांनी अविनाश बोरकर यांना तू हे काम कर असे सांगितले. अविनाश बोरकर यांना याबाबतीत कोणताही अनुभव नव्हता. पण मयेकरांच्या मैत्रीखातर त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि पुढे पार्श्वसंगीताचे जबादारी अविनाश बोरकर यांच्या खांद्यावरच पडली. ‘अंदमान’ या नाटकासाठी त्यांना पार्श्वसंगीताचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर प्र. ल. मयेकरांच्या नाटक आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी ते सांभाळू लागले. व्यावसायिक रंगभूमीवर दीपस्तंभ, रातराणी, अग्निपंख या गाजलेल्या नाटकांच्या संगीताची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. समर्थ रंगभूमीने रत्नागिरीमध्ये सादर केलेल्या प्र. ल. मयेकर लिखित ‘कुंतीपार्थिवा’ या नाटकातील सहकार्य मोलाचे होते. पार्श्वसंगीताबरोबरच अविनाश बोरकर यांना दिग्दर्शनाचीही आवड होती. त्यांनी काही नाटके आणि एकांकिकाही दिग्दर्शित केल्या. अलीकडेच समर्थ रंगभूमीने तयार केलेल्या मयेकरांच्या नाटय़विषयक कारकीर्दीवर आधारित ‘प्र. ल.’ या लघुपटासाठीही अविनाश बोरकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.