Lok Sabha 2019 निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘स्वाइन फ्लू’चाही जोर

सामना प्रतिनिधी । ठाणे

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच सर्व राजकीय पक्ष रणधुमाळीच्या तयारीला लागले असताना स्वाइनचाही जोर वाढला असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. गेल्या अडीच महिन्यांत जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे तब्बल 22 हजार 638 संशयीत रुग्ण आढळले असून त्यापैकी 83 जणांना लागण झाल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. सर्वाधिक 58 रुग्ण ठाणे शहरातील आहेत. गर्दीच्या ठिकाणी स्वाइन फ्लू जोरात फोफावत असल्याने लोकसभा निवडणुकीतही त्याचे सावट घोंगावत आहे. त्यामुळे जाहीर सभा, बाईक रॅली, चौक सभांना जाताना ठाणेकरांनो सावधान… असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

ठाण्यात स्वाइन फ्लूचा फास दिवसेंदिवस घट्ट होत असून त्यामुळे कांचन गौर या पंचावन्न वर्षीय महिलेला फेबुवारी महिन्यात आपला जीव गमावावा लागला. एका महिलेचा स्वाइनने बळी गेल्यानंतरही झपाट्याने हातपाय पसरणाऱ्या स्वाइन फ्लूला रोखण्यात आरोग्य यंत्रणा सपशेल अपयशी ठरली असल्याचे एक महिन्याच्या आकडेवारीवरून पुन्हा उघडकीस आली आहे. जानेवारीत 12 तर 11 फेब्रुवारीपर्यंत ठाणे शहरात स्वाइनचे 33 रुग्ण आढळले होते. त्यात आता आणखीन 25 रुग्णांची भर पडली असून ही संख्या 58 च्या घरात पोहोचली आहे. गेल्या वर्षी शहरात 70 रुग्ण स्वाइनचे रुग्ण आढळले होते. त्यामुळे ठाणेकरांना आणखी काळजी घेण्याची वेळ आली आहे. विशेषतः घोडबंदर परिसरात स्वाइन फ्लूचे जास्त रुग्ण असल्याने चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच आता लोकसभा रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. निवडणुका असल्याने सभा, रॅली होणार म्हणजे गर्दीही जमणार. या धामधुमीत स्वाइन फ्लू फोफावणार नाही याची दक्षता आता राजकीय पक्षांनाही घ्यावी लागणार आहे. तर गर्दीत जाताना विशेष सावधानता बाळगण्याची गरज असल्याचा सल्ला डॉ. गौरी राठोड यांनी दिला आहे.

मीरा-भाईंदर, कल्याण, नवी मुंबईतही जोर
शहराच्या तुलनेत जिल्ह्यात स्वाइनचा जोर कमी असला तरी चिंतेचा विषय बनला आहे. कल्याण, नवी मुंबईमध्ये स्वाइनचे प्रत्येकी आठ रुग्ण आढळले आहेत, तर मीरा-भाईंदरमध्ये नऊजण स्वाइनच्या विळख्यात सापडले आहेत.

उल्हासनगरात एकही रुग्ण नाही
सर्व प्रमुख शहरांमध्ये स्वाईन फ्लूने धुमाकूळ घातलेला असताना सर्वाधिक गजबजलेले आणि गर्दीचे ठिकाण असलेल्या उल्हासनगरात गेल्या दोन वर्षांत एकही स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे उल्हासनगरवासियांना दिलासा मिळाला असला तरी धोका टळलेला नाही.

शहरे                    संशयीत           रुग्ण               मृत्यू
ठाणे                        1504          58                   1
कल्याण                      114          08                   –
नवी मुंबई                18822          08                   –
उल्हासनगर                  –               –                     –
भिवंडी                       190           –                    –
मीरा-भाईंदर                 705          –                     –
ठाणे ग्रामीण                1303          –                     –

एकूण                   22638         83                    1