अहमदाबादेतील अॅक्सिस बँकेत १९ बनावट खात्यांमधील ८९ कोटी जप्त

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

अॅक्सिस बँकेत मोठ्या प्रमाणावर काळ्याचे पांढरे झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आयकर विभागाने बँकेच्या सर्वच शाखांवर वॉच ठेवला आहे. या मोहिमेतंर्गत अहमदाबादमधील अॅक्सिस बँकेवर आयकर विभागाने मारलेल्या छाप्यात १९ बनावट खात्यांमध्ये ८९ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही रक्कम जप्त करण्यात आली असून बनावट खाती सील करण्यात आली आहे. या गैरप्रकारात बँकेच्या चार अधिका-यांचा सहभाग असल्याची शक्यता आयकर विभागाने व्यक्त केली आहे.

नोटबंदीनंतर काळा पैसा शोधून काढण्यासाठी आयकर विभागाने देशभरात छापेसत्र सुरु केले आहे. अहमदाबाद मधील अॅक्सिस बँकेत सोन्याच्या व्यापा-यांनी वेगवेगळ्या नावाने १९ बनावट खाती उघडल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे आयकर विभागाच्या अधिका-यांनी आज सकाळी बँकेवर छापा घातला.

नोटबंदीनंतर अॅक्सिस बँकेत सर्वाधिक काळा पैसा पांढरा करण्यात आल्याचे समोर आले आहे. नोएडातील अॅक्सिस बँकेत २० बनावट खात्यांमध्ये ६० कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे आढळले होते. तर दिल्लीमध्ये नोटबदलीच्या आरोपाखाली अॅक्सिस बँकेच्या दोन अधिका-यांना ईडीने अटक केली होती. त्यापाठोपाठ कोलकात्यामधील अॅक्सिस बँकेच्या शाखेत कमिशनवर नोटबदली करणा-या अधिका-याला ताब्यात घेण्यात आले आहे.

यापार्श्वभूमीवर अॅक्सिस बँकेचे काही अधिकारी आयकर विभागाच्या रडारवर असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिका-याने सांगितले आहे.